
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
1990च्या दशकात सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती जे. एस. वर्मा यांनी ‘हिंदुत्व हा जीवन जगण्याचा मार्ग आहे’ या दिलेल्या निकालावर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी बुधवारी प्रश्नचिन्ह उमटवले. तो निर्णय दोषपूर्ण होता असे सांगतानाच त्या निर्णयामुळे संविधानिक पवित्रतेला धक्का बसला आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. डॉ. सिंग हे दिवंगत कम्युनिस्ट नेते ए. बी. वर्धन स्मृती व्याख्यानमालेत बोलत होते.
राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षतेचे संरक्षण करणे हे आपले आद्यकर्तव्य आहे याचा विसर न्यायसंस्थेला पडता कामा नये, असे त्यांनी सांगितले. धर्मनिरपेक्षता हा संविधानाचा मूलभूत ढाचा आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ सदस्यांच्या खंडपीठाने शिक्कामोर्तब केले होते याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली. माजी न्यायमूर्ती वर्मा यांनी दिलेल्या निकालामुळे धर्मनिरपेक्षतेचा सिद्धांत आणि त्यांच्या पालनाबद्दल राजकीय पक्षांत होणाऱया चर्चेवर परिणाम झाला, असेही डॉ. सिंग म्हणाले.
न्यायाधीशांकडे कितीही सजगता असली आणि ते कितीही बुद्धिमान असले तरी संविधानिक व्यवस्थेचे रक्षण केवळ न्यायसंस्थेकडून केले जाऊ शकत नाही. संविधान आणि धर्मनिरपेक्षतेच्या रक्षणाची अंतिमतः जबाबदारी ही राजकारणी, धार्मिक नेते आणि प्रबुद्ध वर्गाची आहे, असे प्रतिपादन माजी पंतप्रधानांनी केले.
summary- manmohan singh speaks on hindutva






















































