
सामना प्रतिनिधी । पुणे
आपल्या लेखनातून स्त्री अस्मितेचा हुंकार मांडणाऱया आणि संवेदनशील ज्येष्ठ कवयित्री कविता महाजन यांचे गुरुवारी निधन झाले. त्या 51 वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे वडील, मुलगी असा परिवार आहे.
महाजन यांना न्युमोनिया झाला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील चेलाराम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालविली. त्यांची मुलगीही त्याच रुग्णालयात आजारी असल्याने अॅडमिट होती. आता मुलीची तब्येत बरी आहे. कविता महाजन या नुकत्याच मुंबईहून पुण्यात राहायला आल्या होत्या.
कविता महाजनांचे शालेय शिक्षण नांदेडच्या प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालयात झाले. त्यानंतर नांदेडच्या पीपल्स महाविद्यालयात आणि संभाजीनगरच्या शासकीय कला महाविद्यालयात त्यांनी उच्च शिक्षण घेतले. त्या मराठी साहित्य या विषयाच्या एम.ए. होत्या.
कविता महाजन यांच्या साहित्यातील योगदानाबद्दल त्यांना 2008मध्ये ‘यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा राज्यस्तरीय पुरस्कार’, ‘कवयित्री बहिणाई पुरस्कार’, रजई या इस्मत चुगताई यांच्या लघुकथांच्या अनुवादासाठी त्यांना ‘साहित्य अकादमीचा’ भाषांतरासाठीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. ‘मुख्याध्यापिका शशिकलाताई आगाशे’ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा ‘राज्यस्तरीय बालवाड्मय’ पुरस्कारासाठी ‘जोयनाचे रंग’ या कथासंग्रहाला 2013मध्ये गौरवण्यात आले होते.
कविता महाजन यांचे ‘तुटलेले पंख’, ‘आग अजून बाकी आहे’, ‘आगीशी खेळताना’, ‘आबा गोविंदा महाजन- बालसाहित्य आकलन आणि समीक्षा’, ‘कुमारी माता’ अनुवादित पुस्तक तसेच त्यांचा ‘कुहू’ हा लेखसंग्रहही खूप गाजला.
तसेच ‘ग्राफिटीकॉल’, ‘बकरीचं पिल्लू- जंगल गोष्टी’, पाच पुस्तकांचा संग्रह, ‘जोयानाचे रंग’, ‘ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम’, ‘तत्पुरुष काव्यसंग्रह’, ‘तुटलेले पंख (संपादितः भारतीय लेखिका पुस्तक मालिका) हे लेखसंग्रह गाजले. पूल नसलेली नदी (संपादित- भारतीय लेखिका पुस्तक मालिका) कथासंग्रह प्रसिद्ध आहे.
-बायकांचे पाय भुतासारखे उलटे असतात, कुठेही जात असले तरी ते घराकडेच वळतात… कविता महाजन यांच्या गाजलेल्या ‘ब्र’ या कादंबरीतील हे वाक्य बरंच काही सांगून जाते. त्यांना याच कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले होते.





























































