
सामना प्रतिनिधी । मुंबई
बक्कळ पैसे कमावण्यासाठी वन विभागाच्या शेकडो एकर जागेवर दावा करून गगनचुंबी इमारती उभारण्याच्या बेतात असलेल्या बिल्डरांना मुंबई उच्च न्यायालयाने आज चांगलाच दणका दिला. वन विभागाने ताब्यात घेतलेली जमीन आमच्या पूर्वजांची असून ती आमच्या ताब्यात परत द्या, अशी मागणी करणाऱया 176 याचिका हायकोर्टाने आज फेटाळून लावल्या. विकासाच्या नावाखाली वन जमिनींवरील निसर्गाचा ऱ्हास होईल. त्यामुळे सरसकट वन जमिनी बिल्डरांच्या नावावर करता येणार नाहीत, असे मतही सुनावणी दरम्यान हायकोर्टाने नोंदवले.
आमच्या पूर्वजांची जमीन असूनही शासनाने आम्हाला त्या जमिनीतून बेदखल केले. त्यामुळे आम्हाला आमची जमीन परत ताब्यात द्या, अशा मागणीच्या 176 याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. वन जमिनीवर दावा करणाऱया विकासकांच्या या याचिकेवर न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती पी.डी. नाईक यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी घेण्यात आली. त्या वेळी सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी बाजू मांडताना खंडपीठाला सांगितले की, जमिनीवर दावा करणाऱया याचिकाकर्त्यांना जून 1956 साली शासनाने नोटीस बजावली होती. असे असतानाही त्यांनी या नोटिसीला उत्तर दिले नाही. त्यामुळे 1975च्या खाजगी वने भूसंपादन कायद्यानुसार शासनाने या जमिनी ताब्यात घेतल्या आहेत. शिवाय जे मूळ जमीन मालक आहेत त्यांनी या नोटिसीला कोणताही आक्षेप घेतलेला नाही. न्यायालयाने राज्य सरकारचा हा युक्तिवाद ग्राह्य धरत याचिकाकर्त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. याशिवाय वन विभागाच्या ताब्यातील भूखंड मिळविण्यासाठी बिल्डरांनाच रस असल्याचे स्पष्ट करत हायकोर्टाने या सर्व याचिका फेटाळून लावल्या.




























































