
सामना ऑनलाईन । पाटणा
सध्या पितृपक्ष सुरू असून या दिवसात पितरांचे आशीर्वाद मिळावे त्यांना मोक्ष मिळावा यासाठी विविध विधी केले जातात. जर तुम्हीही असेच काही विधी करणार असाल तर वेळीच सावध व्हा. कारण पितृपक्ष आणि त्यामागची लोकांची श्रद्धा याचा गैरफायदा घेत अनेक तोतये भटजी तुमच्या आजूबाजूला वावरत आहेत. अशाच एका तोतया भटजीला बिहारमधील पितृपक्ष मेळाव्यात अटक करण्यात आली आहे. मंत्रांचे ज्ञानच नसलेला हा तोतया भटजी मंत्रोच्चाराच्या नावाखाली वाटेल ते बडबडत होता. यामुळे तिथे उपस्थित असलेल्या लोकांना संशय आला. त्यानंतर त्याचा पर्दाफाश झाला.
पितृपक्ष सुरू असल्याने बिहारमधील गया येथे १५ दिवस चालणाऱ्या पितृपक्ष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात देशविदेशातील लाखो नागरिक सहभागी झाले असून पूर्वजांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी पिंडदान व इतर विधी करत आहेत. गुरुवारीही येथे असाच पिंडदानाचा विधी सुरू होता. पण त्यातील एक भटजी जे मंत्र उच्चारत होता ते सगळ्यांच्या डोक्यावरून जात होते. तो मंत्र उच्चारत नसून भलतेच काही बरगळत असल्याचे तेथे उपस्थित असलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या लक्षात आले. याबद्दल त्याला विचारले असता त्याची पुरती फजिती झाली. अखेर लोकांनी त्याला चांगलेच बदडून काढले. याबद्दल कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या तोतया भटजीला अटक केली. त्यावेळी आपण भटजी नसून केवळ पैसे उकळण्यासाठी दोन चार मंत्र शिकलो व त्यावरच पूजा करत असल्याची त्याने कबुली दिली. तसेच आपल्यासारखेच अनेक तोतये या पितृपक्षात विधी करत असल्याचे त्याने सांगितले.
दरम्यान, या घटनेनंतर जिल्हाप्रशासनाने तातडीची बैठक बोलवून तोतया भटजींवर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.






















































