
सामना प्रतिनिधी । पुणे
खडकवासला धरणाच्या मुठा कालव्याला ज्या ठिकाणी भगदाड पडले, त्या ठिकाणी कालाव्याच्या मातीच्या भिंतीमध्ये तब्बल ६ केबल टाकण्यात आल्या होत्या. कालव्याच्या पाण्यापासून अवघ्या तीन ते पाच फुटांवर केबल टाकल्या आहेत. या केबल टाकताना कालव्याची भिंत खोदली. त्यातच या कालव्याच्या शेजारी पालिकेने खडकवासला ते पर्वती जलकेंद्रादरम्यान बंदिस्त पाइपलाइन टाकली आहे. त्यामुळे कालव्याची भिंत भुसभुसीत होऊन भराव खचून तो फुटला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
खडकवासला कालव्याला सकाळी सव्वाअकराच्या सुमारास दांडेकर पुलाजवळ भगदाड पडले. त्यानंतर हा कालवा कसा फुटला, याबद्दल तर्कविर्तक लावले जात आहेत. मात्र, या कालव्याला ज्या ठिकाणी कालव्याला भगदाड पडले, त्या ठिकाणी मातीच्या भिंतीमध्ये तब्बल ६ केबल टाकण्यात आल्या आहेत. त्यात २ केबल खासगी कंपन्यांच्या असून, काही केबल महावितरणच्या आहेत. या केबल कालव्याची भिंत खोदून टाकण्यात आल्या आहेत. कालव्याच्या पाण्यापासून अवघ्या तीन ते पाच फुटांवर ही केबल आहे. त्यामुळे ही केबल खोदताना कालव्याची भिंत खोदली आहे.
पुणे महापालिका पर्वती आणि लष्कर जलकेंद्र वगळता अन्य सर्व ठिकाणी बंदिस्त पाइपलाइनमधून पाणी घेतले जात आहे. खडकवासला ते पर्वती जलकेंद्रादरम्यान २ हजार २०० मिलीमीटर व्यासाची पाइपलाइन टाकली आहे. कालव्यापासून पाच मीटर अंतरावर ही पाइपलाइन टाकली जात आहे. त्यामुळे कालव्याची भिंत भुसभुसीत झाली आहे. त्यातून या कालव्याला भगदाड पडले असल्याची शक्यता स्थानिक नागरिकांनी आणि नगरसेवकांनी व्यक्त केली आहे.






























































