
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबई विद्यापीठाच्या टीवाय बीएच्या अभ्यासक्रमात असलेली अश्लील कविता ताबडतोब वगळा अशी जोरदार मागणी करीत युवासेनेने विद्यापीठावर धडक दिली. यावेळी हादरलेल्या प्रशासनाने ‘ती’ कविता अभ्यासक्रमातून वगळण्याचे आश्वासन देत पुन्हा अशी चूक घडणार नाही अशी हमी दिली.
विद्यापीठाच्या टीवाय बीएच्या पुस्तकात ‘पाणी कसं अस्तं’ ही कविता देण्यात आली आहे. यामध्ये कवीने पाण्याला वेगवेगळय़ा उपमा देताना वादग्रस्त उपमा दिली आहे. याची गंभीर दखल घेत युवासेना सिनेट सदस्यांच्या शिष्टमंडळाने प्र-कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांची भेट घेऊन संबंधित चूक निदर्शनास आणून देत तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली. यावेळी विद्यापीठाकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली. ही कविता अभ्यासक्रमातून काढून टाकण्याचे आश्वासनही यावेळी देण्यात आले. यावेळी युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, डॉ. सुप्रिया करंडे, धनराज कोहचाडे, ऍड. वैभव थोरात उपस्थित होते.






















































