सहज सुंदर प्रतिबिंब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>>विवेक गोविलकर 

सध्या नवोदित लेखकांना ब्लॉग ही चांगली सोय उपलब्ध झाली आहे. ब्लॉग म्हणजे कोणत्याही संपादकाच्या किंवा प्रकाशकाच्या मध्यस्थीशिवाय इंटरनेटवर शेकडो-हजारो वाचकांबरोबर नियमितपणे अनौपचारिक भाषेत साधलेला संवाद. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पर्यावरणतज्ञ ‘डॉ. प्रसाद मोडक’ हे कामानिमित्त जगभर हिंडत असतात. या प्रवासात भेटलेले देशोदेशीचे अनेक लोक, भेट दिलेल्या जागा, घडलेल्या घटना, विलक्षण अनुभव आणि याच्या जोडीला त्यांचे चिंतन, या सर्वांचे प्रतिबिंब त्यांच्या गेले काही वर्षे सातत्याने लिहिलेल्या काही खऱया आणि काही काल्पनिक कथांमधे दिसून येते. आपल्या ब्लॉगवर त्यांनी प्रसिद्ध केलेल्या अशा काही निवडक लेखांचा आणि कथांचा संग्रह ‘कलायडोस्कोप’ या नावाने नुकताच प्रसिद्ध झाला आहे. ललिता वैद्य यांनी या इंग्रजी लेखनाचा सहजसुंदर मराठी अनुवाद केला आहे.

मुंबईच्या जगद्विख्यात आयआयटी या संस्थेतून स्थापत्यशास्त्र आणि पर्यावरण विज्ञान या विषयांमधे पदव्या मिळवल्यानंतर लेखकाने बँकॉकच्या एशियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतून पीएच.डी. मिळवली. प्राध्यापक, अनेक सरकारांचे सल्लागार आणि विशेषज्ञ म्हणून काम करणाऱया लेखकाने आतापर्यंत पर्यावरणासंदर्भात अनेक इंग्रजी पुस्तके लिहिली आहेत. अनुवादाच्या रूपाने आलेले हे लेखकाचे पहिलेच मराठी प्रकाशन आहे. ‘कलायडोस्कोप’ म्हणजे शोभादर्शकातून बघितल्यास काचेच्या वेडय़ावाकडय़ा आणि फुटक्या तुकडय़ांमधून सुंदर नक्षी तयार झालेली दिसते. लेखकाच्या अनुभवांचे आणि जाणिवांचे धारदार तुकडे या पुस्तकाच्या माध्यमातून एका मनोहर चित्रासारखे आपल्यासमोर उभे राहतात.

या पुस्तकात अनेक व्यक्तिचित्रे आहेत. लेखकाच्या जिवलग मैत्रिणी बाईक आणि व्हेरा, हिंदुस्थानविषयी आस्था बाळगणारे पाउलो आणि मारिया हे भाऊ-बहीण, चॅपेल रोडवरचा अवलिया चित्रकार, धनगरगीताचा गीतकार आणि गायक असलेला ड्रायव्हर सिद्धू, सुप्रसिद्ध स्तंभलेखक ‘बिझी बी’ यांच्या लेखनाची आठवण करून देणारा आणि 104 व्या मजल्यावर राहणारा अतिश्रीमंत ‘मित्र’ अशा काही खऱया आणि काही काल्पनिक पात्रांची वाचकांना होणारी ओळख अतिशय हृद्य आहे.

लेखकाने आपले चिंतन वाचकांसमोर ठेवण्यासाठी आणि पर्यावरणविषयक काही संदेश देण्यासाठी ‘फँटसी’ या लेखनप्रकाराचा वापर केला आहे. पृथ्वीवरच्या सर्व लोकांना लागलेले स्मार्टफोनचे व्यसन सोडवण्यासाठी इंद्रदेवाने योजलेले उपाय, लेखकाला हृदयविकाराचा झटका येण्याची पूर्वसूचना देणाऱया देवाबरोबरचा त्याचा संवाद, देवांच्या राज्यामधे शाश्वत व्यवस्थापन राबवण्यासाठी लेखकाचा सल्ला मागणारे भगवान विष्णू, स्वच्छता मोहिमेच्या विरोधातली कावळ्यांची सभा, हिंदुस्थानींनी पर्यावरणाविषयी जागरूक व्हावे यासाठी प्रयत्न करताना अरेबियन नाइटस्मधल्या हरून अल् रशीदने लेखकाकडे मागितलेली मदत, चित्रगुप्त आणि यमाचा पर्यावरणाच्या समस्येवरचा संवाद, अशा विविध विषयांवरच्या कथा या संग्रहात आहेत. चेहरे वाचण्याची कला, लेखकाची संगीताची आवड आणि छंद, योगायोगाने किंवा कामाच्या निमित्ताने झालेल्या थोरामोठय़ांच्या भेटी अशा अनेक कथा लेखकाने रंगवून सांगितल्यामुळे पुस्तक अतिशय मनोरंजक आणि वाचनीय झाले आहे. मनीष रांगणेकर या चित्रकाराच्या देखण्या रेखाचित्रांमुळे या पुस्तकाची शोभा वाढली आहे याचा विशेष उल्लेख केला पाहिजे.

कलायडोस्कोप

लेखक: प्रसाद मोडक

अनुवाद: ललिता वैद्य)

प्रकाशक: इंकिंग इनोव्हेशन्स

पृष्ठ:238, मूल्य: 300  रुपये