
>>>देवानंद भुवड
‘शब्दांचे फटाके’, ‘आभाळाचं घर’ आणि ‘धमाल गंमत’ ही अशोक लोटणकर यांची एकत्रित प्रकाशित झालेली बालसाहित्यविषयक तीन पुस्तके. यातील ‘शब्दांचे फटाके’ हा बालकथासंग्रह असून ‘आभाळाचं घर’ आणि ‘धमाल गंमत’ हे दोन बालकवितासंग्रह आहेत. या तिन्ही पुस्तकांत लोटणकर यांनी बालमनाला रुचेल, पटेल अशा साध्या-सोप्या भाषाशैलीचा वापर केलेला आहे. ‘करील मनोरंजन जो मुलांचे, प्रभूशी नाते जडेल तयाचे’ या उक्तीप्रमाणे आपल्या साहित्यकृतीतून लोटणकरांनी आपले नाते प्रभूशी जोडल्याचे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.
‘शब्दांचे फटाके’ या कथासंग्रहात एकूण 24 कथा समाविष्ट आहेत. यातील बहुसंख्य कथा या आई-मुलगा, वडील, आजोबा अशा नात्यांचा मागोवा घेणाऱया आहेत. ‘चिमणीचं घरटं’, ‘फुलझाडाचं मन’ या कथांमधून वाचकांना आई-मुलाच्या नात्यातील लडिवाळपणा, खेळकरपणा, ममत्व ओतप्रोत झिरपणारे प्रेम याचा प्रत्यय येतो. लोटणकरांची सहजसुंदर, ओघवती भाषाशैली पाहता प.पू. साने गुरुजींची ‘श्यामची आई’ आठवल्याशिवाय राहत नाही. भूतदया, आदर, चंदन, झाडांचा संदेश, वाघा बॉर्डर, कोकिळा आणि कावळा, पाऊस सखा, आभाळातील भावंडं या कथा बालवाचकांना विशेष आकर्षित करणाऱया आहेत. यातून संस्कारक्षमता, निसर्गाची विविध रूपे, नातेसंबंधांतील ओलावा याच्या जपणुकीचा आदर्श ठेवलेला आहे. यातील प्रत्येक कथा ही वैशिष्टय़पूर्ण, आशयसंपन्न, लालित्य-नाटय़ याचा प्रत्यय घडविणारी आहे. हा कथासंग्रह म्हणजे बालसाहित्यातील एक अनमोल ठेवाच म्हणावा लागेल. डॉ. सुमन नवलकर यांची वैशिष्टय़पूर्ण प्रस्तावना या कथासंग्रहाचा मानबिंदू म्हणावा लागेल.
‘आभाळाचं घर’ आणि ‘धमाल गंमत’ या दोन कवितासंग्रहांनी बालजगत मंतरून आणि मोहून टाकण्याची किमया साध्य केलेली आहे. ऊन-पाऊस, राक्षस-परी, पशू-पक्षी, आई-आजी-आजोबा, निसर्ग, फुले, पाऊस यांमध्ये बालमन रंजी घालते… विशेष म्हणजे या संग्रहांतील प्रत्येक कविता ही चित्रमय असल्याने कवितेचा आशय समजण्यास बालवाचकांना सोपे झाले आहे. त्यामुळे कवितेचे आकलन वाचता वाचताच चटकन होऊन जाते. ‘आभाळाचं घर’ या काव्यसंग्रहातून पाने, फुले, फुलपाखरू, चिमण्या, वेगवेगळे प्राणी आणि त्यांच्या सवयी, लकबी, आंबराईतली झाडं, पाऊस, गुलाबी-कडाक्याची थंडी, धुक्याची ऊबदार शाल, मोकळे आभाळ, स्वच्छंदी चांदणे आणि ऋतुमानातील विविध बदल, सजीव-निर्जीव अशा निसर्गातील गोष्टी कवीने शब्दबद्ध करून बालकांचे निखळ मनोरंजन करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतल्याचे जाणवते.
चला मुलांनो कोकणात जाऊ
कोकणी मेवा पोटभर खाऊ…
काळीकच्च करवंदं, टपोरी जांभळं
पिकलेली बोरं, हिरवे काजू
रायवळ आंबे, हापूस आंबे
मोठे मोठे फणस चवीनं खाऊ
रसाळ वासानं मोहून जाऊ
अशा शब्दांत कवी कोकणची संपदा वाचकांच्या डोळय़ांसमोर ठेवतो… कधी कधी पावसात भिजवून आणतो तर कधी आजोबांच्या सान्निध्यात छान छान गोष्टी ऐकायला भाग पाडतो. तसेच ‘धमाल गंमत’ हा काव्यसंग्रह तर आनंदाची पखरण करणारा आहे… यात बालकांना आकर्षित करणारा ‘म्हातारीचा बूट’ चितारलेला आहे. वाघाची मावशी, प्राण्यांची मजेशीर शाळा, हुप हुप माकड, बंडूचे क्रिकेट, मामाचे अंगण, आकाश कंदील आणि आनंदाचे गाणे या कवितांतून बालकल्पनेतील अद्भुत जगताची ओळख कवी सहजसुंदरतेने करून देतो.
पुनवेचा चंद्रमा डोकावतो अंगणी
नारळीच्या झावळात लुकलुकते चांदणी
चंदेरी चांदण्यात स्वप्न नवे पाहू
सूर असे छेडूनिया गीत नवे गाऊ
असे उद्याचे नवे गीत गाण्यासाठी कवीने आपल्या प्रतिभेचे शिंपण केलेले आहे… लोटणकर यांचे हे साहित्य बालवाचकांना प्रेरणादायी, रंजक आणि मार्गदर्शक ठरेल अशी मनोमन आशा वाटते. ‘धमाल गंमत’ची प्रस्तावना यशवंत ब. क्षीरसागर यांची आहे तर ‘आभाळाचं घर’ची प्रस्तावना प्रा. प्रवीण दवणे यांची आहे. अत्यंत समर्पक आणि पुस्तकांतील आशय सहज स्पष्ट करणाऱया आशयघन प्रस्तावना या संग्रहांना लाभलेल्या आहेत. कैलास वेर्णेकर यांचे मुखपृष्ठही अत्यंत समर्पक झालेले आहे.
शब्दांचे फटाके (बालकथा संग्रह)
लेखक: अशोक लोटणकर
शिवानी पब्लिकेशन
पृष्ठ: 80, मूल्य: 120 रुपये
आभाळाचं घर (बालकवितासंग्रह)
लेखक: अशोक लोटणकर
शिवानी पब्लिकेशन
पृष्ठ: 38, मूल्य: 70 रुपये
धमाल गंमत (बालकवितासंग्रह)
लेखक:अशोक लोटणकर
शिवानी पब्लिकेशन
पृष्ठ: 34, मूल्य: 70 रुपये



























































