महाराष्ट्रात पोलिओ व्हायरस घुसला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन । मुंबई

हिंदुस्थान पोलिओमुक्त करण्याच्या स्वप्नाचा चक्काचूर झाला. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातून पोलिओ व्हायरसचे अजूनही उच्चाटन झालेले नाही. उत्तर प्रदेशातील अनेक बालकांच्या शौचामध्ये पोलिओचे विषाणू आढळल्याचे खुद्द केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेच स्पष्ट केले आहे. त्या बालकांना ज्या पोलिओ लसी दिल्या गेल्या होत्या त्यांचा पुरवठा महाराष्ट्रातही केला गेला होता. त्या लसी बनवणाऱ्या बायोमेड कंपनीच्या संचालकाला नवी दिल्ली येथे अटक करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशच्या बलरामपूरमधील पडरौना गावात सहा वर्षीय मेहताब याला गेल्या शुक्रवारी ताप येऊन त्याचे दोन्ही पाय लुळे पडले होते. जिल्हा रुग्णालयात त्याच्या वैद्यकीय चाचण्या केल्या गेल्या. मेहताबला पोलिओ झाल्याचे निदान करून त्याच्यावर उपचार सुरू केले गेले आहेत. दरम्यान, त्याच्यासह ज्या बालकांना पोलिओच्या लसी दिल्या गेल्या त्यांच्या शौचाचे नमुने तपासले गेले. त्यामध्येही पोलिओचे टाइप-2 विषाणू आढळल्याने देशाची आरोग्य यंत्रणाच हादरून गेली आहे.

उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद येथील ‘बायोमेड प्रायव्हेट लिमिटेड’ या औषध कंपनीमध्ये पोलिओ लसींची निर्मिती झाली होती. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याप्रकरणी एफआयआर दाखल केल्यानंतर पोलिसांनी बायोमेडच्या व्यवस्थापकीय संचालकाला अटक केली आहे. इतर चार संचालकांचाही शोध सुरू असून त्यांच्या चौकशीनंतरच काही धागेदोरे सापडणार आहेत.

बायोमेडची पोलिओ लस महाराष्ट्रात बॅन, आरोग्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
बायोमेड कंपनीने तयार केलेल्या पोलिओ लसीचा वापर केंद्र सरकारच्या निर्देशानुसार महाराष्ट्रात थांबविण्यात आला असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली. बायोमेड या कंपनीकडून पुरविल्या जाणाऱ्या लसींमध्ये पोलिओचा अॅक्टिव्ह व्हायरस आढळला होता. महाराष्ट्रातही या लसी पुरविण्यात आल्या असल्याने चिंतेचे वातावरण होते. मात्र केंद्र शासनाने 10 सप्टेंबर रोजी या कंपनीच्या लसींचा वापर न करण्याबाबतच्या सूचना राज्याला दिल्यानंतर 11 सप्टेंबरपासून त्याचा वापर राज्यात बंद झाला आहे. पोलिओ लसीकरणात 2016पर्यंतच टाइप टू व्हॅक्सिनचा वापर करण्यात आलेला आहे. यासंदर्भात केंद्र सरकारसोबत चर्चा करून पुढील दिशा ठरविली जाईल, असे डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले. महापालिकेच्या आरोग्य केंद्रांमध्येही या लसींचा वापर याआधीच थांबविण्यात आला असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडूनही स्पष्ट करण्यात आले आहे.