पाकिस्तानी हेलिकॉप्टरची हिंदुस्थानात घुसखोरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पूंछ

जम्मू-काश्मीरच्या पूंछ सेक्टरमध्ये नियंत्रणरेषेवर पाकिस्तानी हेलिकॉप्टरने शिरकाव केला, मात्र हिंदुस्थानी जवानांनी जोरदार गोळीबार करत हे हेलिकॉप्टर पळवून लावले.  दुपारी सव्वाबाराच्या सुमारास हा प्रकार घडला.

नियंत्रणरेषेवर डोंगराळ भागात अचानक एक हेलिकॉप्टर फिरताना दिसले. हे पाहून सुरक्षा दलाचे जवान तत्काळ सतर्क झाले आणि त्यांनी हेलिकॉप्टरच्या दिशेने फायरिंग करून हे हेलिकॉप्टर पळवून लावले. संरक्षण मंत्रालयाच्या पीआरओनेही या घटनेला दुजोरा दिला आहे. या घटनेनंतर नियंत्रणरेषेवर अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

पाकिस्तानने हिंदुस्थानी हद्दीत हेलिकॉप्टर का घुसवले याचा शोध घेतला जात आहे. विशेष म्हणजे संयुक्त राष्ट्र संघात परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांचा बुरखा फाडलेला असतानाच पाकिस्तानचे हेलिकॉप्टर हिंदुस्थानी हद्दीत दिसले आहे. त्यामुळे हा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

summary: pakistani helicopter violates indian airspace retreats after army sentries open fire