विठुरायाच्या अन्नछत्रात मिळणार भक्तांना पोटभर जेवण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पंढरपूर

श्री विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी घरच्या प्रमाणे परिपूर्ण आणि पोटभर भोजनप्रसाद देण्याचा महत्वपूर्ण निर्णय समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी मातेस अर्पण होणारी महावस्त्रे निराधार व अनाथ आश्रमातील महिलांना वाटप करण्याचे ठरले.

मंदिर समितीची बैठक समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांच्या अध्यतेखाली झाली. यावेळी उपाध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य शकुंतला विजयकुमार नडगिरे, सचिन अधटराव, भास्करगिरी गुरुकिसनगिरी बाबा, संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर नामदेव देशमुख-जळगांवकर, अ‍ॅड. माधवी निगडे, प्रकाश रुस्तुमराव जवंजाळ, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, साधना भोसले, कार्यकारी अधिकारी सचिन ढोले, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड उपस्थित होते.

या बैठकीत सर्व्हे नं. ५९ येथील नवीन भक्तनिवास बांधकाचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये भक्तनिवास कार्तिकी यात्रेपूर्वी वापरात आणण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे ठरले. नवरात्रोत्सव कार्यक्रम २०१८ कालावधीत विविध प्रकारे समाज प्रबोधानात्मक कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरले. दैनंदिनी व दिनदर्शिका २०१९ छपाई करण्याचे ठरले आहे.

त्याचबरोबर अन्न छत्राच्या पदार्थामध्ये देखील बदल करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला गेला यापुर्वी अन्नछत्रात फक्त भात आणि आमटी दिली जात होती यापुढे चपाती, भाजी, भात, स्वीट डिश आदी अन्य पदार्थ दिले जाणार आहेत तर उपवासाला भगर आणि खिचडीचे नियोजन केले आहे

मंदिर समितीकडील सर्व जमिनी धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणी करण्याचे ठरले आहे. दर्शन रांगेत कासार घाट ते पत्राशेड पर्यंत स्कायवॉक व पत्राशेड येथे दर्शन हॉल बांधण्याबाबत तयार करण्यात आलेल्या अंदाजपत्रकास, नकाशे व खर्चास तत्वत: मान्यता देण्यात आली आहे.

असे आहे कार्तिकी यात्रेचे नियोजन
कार्तिकी यात्रा २०१८ यात्रा ५ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत भरत आहे. यात्रेचे नियोजन आषाढी यात्रेप्रमाणे करण्याचे ठरविण्यात आले. यामध्ये दर्शन रांगेसाठी बॅरीकेटींग करणे, लोखंडी उड्डाणपुल उभारणे, तात्पुरते पत्राशेड उभे करणे, खाजगी सुरक्षा व्यवस्थेसाठी महाराष्ट्र कमांडो फोर्स, नातुपते यांच्याकडील कमांडो बंदोबस्तासाठी नियुक्त करणे. दर्शन मंडपापासून ते पत्राशेड पर्यंत जादा सीसीटिव्ही कॅमेरे बसविणे. दर्शन रांगेमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी मिनरल वॉटरची व्यवस्था करणे, दर्शन मंडपामध्ये दशमी, एकादशी व द्वादशीला मोफत चहाची व्यवस्था करणे. पुरेशा प्रमाणात बुंदी व राजगिरा लाडु प्रसादाची व्यवस्था करणे. देणगी जमा करुन घेण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत करुन घेणे, स्वच्छता व्यवस्थेचे चांगले नियोजन करणे. यासर्व बाबी नियमाप्रमाणे व पुरेशा प्रमाणात करण्याचे ठरले आहे.

कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय
मंदिर समितीच्या सर्व कर्मचार्थ्यांना दिपावलीसाठी एक पगार सानुग्रह अनुदान तसेच समितीकडील कायम कर्मचारी यांना एकूण मासिक पगाराच्या १५ टक्के, हंगामी कर्मचार्थ्यांना २० टक्के व मानधन कर्मचार्थ्यांना २५ टक्के प्रमाणे ऑक्टोंबर २०१८ पासून पगावर वाढ देण्यास मान्यता देण्यात आली. आस्थापनेवरील २६५ कर्मचार्थ्यांना १ अधिक ५ प्रमाणे ग्रुप मेडीकल इन्स्शूरन्स विमा उतविण्याचे कामी बजाज अलियांझ यांचा प्रस्ताव मान्य करण्यात आला. त्यासाठी २१ लाख २१ हजार ५९० रुपये प्रिमीयम अदा करण्यात येणार आहे.

९८ हजार ९२३ झाडांचे संगोपन व संवर्धन
मानवाच्या पर्यावरण विरोधी भुमिकांमुळे पृथ्वीवरील सजीव सृष्टी संपुष्टात येण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पर्यावरण पुरक अशा गोष्टी राबविण्याच्या दृष्टीने मानवाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. तरच भविष्यात पृथ्वीवरती सजीव सृष्टी अस्तित्वात राहणार आहे. वास्तव परिस्थितीतील सतत वाढणाऱ्या प्रदुषणाचा धोका ओळखुन अनेक संस्था गेले काही वर्ष पर्यावरण संदर्भातून हरित संवर्धनाविषयी कार्य करत आहे. या अभियांना अंतर्गत श्री क्षेत्र पंढरपूर मध्ये विविध संस्थांमार्फत ९८ हजार ९२३ देशी वृक्ष लावण्याचा सदस्य शिवाजीराव मोरे यांचा मानस आहे. या झाडांचे संगोपन व संवर्धन मंदिर समिती मार्फत करण्याचे ठरले आहे.