आरोपी सोडण्यासाठी जळगावजामोद पोलीस स्टेशनवर दगडफेक ; तीन पोलीस जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
maharashtra-police2

सामना प्रतिनिधी । बुलढाणा

विनयभंगातील आरोपीला आमच्या स्वाधीन करा, या मागणीसाठी पीडित महिलेच्या समर्थकांनी सोमवारी सकाळी १० च्या सुमारास जळगावजामोद पोलीस ठाण्यावर दगडफेक करुन पोलिसांना शिवीगाळ केली. या दगडफेकीत तीन पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहे. या दगडफेक प्रकरणी एकास अटक करुन १५ जणांवर गुन्हे दाखल केले आहे.

शेतात जात असलेल्या ३२ वर्षीय महिलेचा विनयभंग आरोपी शे. शाहरुख शे. सादीक (३१, रा. जामोद, ता. जळगावजामोद) केल्याप्रकरणी त्याच्यासह साथीदारांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात येवून पोलिसांनी आरोपीस अटक केले होते. परंतु विनयभंग प्रकरणात पीडित महिलेचे समर्थकांनी जळगाव जामोद पोलीस ठाण्यासमोर २५-३० लोकांचा जमाव एकत्र येत आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी केली.

पोलिसांनी ही मागणी धुडकावताच संतप्त जमावाने पोलिसांना शिवीगाळ करत दगडफेक केली. या दगडफेकीत तीन पोलीस कर्मचारी दिपक साळूंके, अजयसिंह राठोड व अक्षय काठोडे हे किरकोळ जखमी झाले. सदर प्रकरणी पोलिसांनी दगडफेकीतील आरोपी अजय मोतीराम धुर्डे याला अटक केली असून इतर पंधरा लोकांवर गुन्हे दाखल केले आहे.