
>> श्रुती संचेती
आज महात्मा गांधी जयंती. गांधीजींची आवडती खादी आपली राजकीय प्रतिमा कधीच मागे टाकून आधुनिक फॅशन जगतात विविध साज लेऊन मिरवतेय…
खादी म्हणजे राजकीय पोषाख… पारंपरिक कुर्ता, पायजमा… हा समज आता मागे पडत चाललाय… कारण फॅशन जगतात खादीचे कपडे फॅशनेबल, स्टायलिश, श्रीमंती लूकमध्ये पाहायला मिळतात… उन्हाळ्यात हे कापड सगळ्यात जास्त वापरले जाते… खादीचे कापड हाती बनवले जाते… थंडीतही खादी ऊब देते. आरामदायक आणि श्रीमंतीचा ट्रेंड म्हणून याकडे पाहिले जाते… सध्या महाविद्यालयातील तरुण-तरुणींमध्ये खादीचे कपडे वापरण्याला पसंती आहे. पारंपरिक पोषाख म्हणूनही खादीच्या कपड्यांत आजची पिढी वावरताना दिसते.
लग्नकार्य, समारंभ, सोहळे अशा कार्यक्रमातही पारंपरिकता जपण्यासाठी खादीच्या साड्यांचा वापर केला जातो. कॉटनपासून खादीचे कापड बनवले जाते. त्यामध्ये सिल्क किंवा लोकरीचा वापर केला जातो. थंडीत गरम आणि उन्हाळ्यात थंड वाटणारं हे सर्व ऋतूंमधलं कापड आहे. खादीचा कपडा आता कापड उद्योगात मोठ्या प्रमाणात तयार होत आहे. गांधीजींप्रमाणे चरख्यावर सूत कातून नाही तरी तिची परंपरा जपली पाहिजे म्हणून खादीवर बरेच फॅशन डिझायनर नवनवीन लूक देण्याचं काम करत आहेत. फॅशनेबल टच देऊन त्यात काय नावीन्य आणता येईल यासाठी सरकारचेही प्रयत्न सुरू आहेत. म्हणून आता पाश्चात्य पोषाखामध्येही खादीचे कपडे दिसतात. रॅप्ड स्कर्ट, लॉन्ग मॅक्सी गाऊन्स आणि साडी यामध्ये खादीला जास्त मागणी आहे. शिवाय आता डल व्हाइट, खाकी, ऑफ व्हाइट, राखाडी अशा डल शेडस् न राहता केशरी, हिरवा, निळा असे ब्राइट रंग दिसतायत. आजकाल खादीचे फक्त कपडेच नव्हे तर खादीच्या बॅगा, खादीचे पेपर, सतरंजा, जाजम, ड्रॉइंग कॅनव्हास, टॉवेल, पंचा या गोष्टींसाठीही देशा-विदेशातून मागणी आहे.
देखणे विविध रंग
नेहमीप्रमाणे दिसणाऱ्या रंगांसोबत अगदी गडद, ब्राइट लाल, काळा, निळा, ग्रे असे रंगही उपलब्ध आहेत. प्लेन ते चेक्स अशा प्रिंटस्ही खादी फेब्रिक मिळू लागले आहे. काही ब्लेझरवरती तर छोट्या छोट्या चरख्याचा प्रिंटस्ही आहेत. रेमंडप्रमाणे उर्वशी कौर या लेबल अंतर्गत ‘प्रहारा’ नावाचं मेन्स आणि वुमेन्स कलेक्शन नुकतंच बाजारात आलं आहे. यातही बऱ्याच ड्रेसमध्ये खादीचा वापर केला गेला आहे. फॅशनेबल असे खादीचे बॉक्सी शर्ट, पॅट आणि लॉग जॅकेट असा मुलांसाठी लूक तर मुलींसाठी इंडोवेस्टर्न वनपीस, शर्ट ड्रेस, खादी पलाझो, खादी ब्लाऊज असे अनेक प्रकार उपलब्ध केले आहेत. हे डिझाइन बनवताना त्यासोबत हॅन्ड प्रिंट टेक्निकचा, क्राफ्टस्चाही वापर केला जातो.
दागिन्यांसोबतही बेस्ट
खादी सिल्कच्या साडीमुळे क्लासिक लूक येतो. अशा साड्यांवर मोत्यांचा डिसेंट नेकलेस आणि इअररिंग्ज एवढय़ा ऍक्सेसरीजसुद्धा लूकमध्ये आणखी उठाव आणतात. स्त्रिया शालीन दिसतात. मॉडर्न लूकसाठी जरदोसीचं वर्क केलेली आणि ब्लॉक प्रिंट असलेली खादीची साडी निवडावी. खादीच्या प्लेन साडीवर भरतकाम केलेलं ब्लाऊज उठून दिसतं. कुर्त्यांवर कोल्हापुरी चपला उठून दिसतात. साधा तरीही व्यक्तिमत्त्वात आकर्षकपणा येतो.
नवी फॅशन…
खादीचे ब्लेझर, पँट, लाँग जॅकेटस्, डिझायनर शर्ट, कुर्ते, शेरवानी, क्लासिक जॅकेटस्, प्रिंटेड शर्ट, स्कार्फ, बंद गळा जॅकेटस्, फिट बंडी हे मुलांसाठी, तर मुलींसाठी खादी प्रिंटेड अनारकली, इंडो-वेस्टर्न वनपीस, शर्ट ड्रेस, खादी पलाझो, खादी ब्लाऊज, साडी अनारकली, घागरा चोळी असे खादी विविध तऱ्हेच्या कपड्यांचा ट्रेंड बाजारात सुरू आहे. विशेष म्हणजे सध्या समर डेस्टिनेशन वेडिंगसाठी बाजारात खास खादीचं नुकतंच नवं कलेक्शन मिळू लागलं आहे.
कसे स्वच्छ कराल?
खादीचे कपडे ड्रायक्लीन करावेत. घरी धुवायचे झाल्यास थोडासा साबण वापरून गार पाण्यात छुवावेत. हे कपडे जास्त पिळू नयेत. सूर्यप्रकाशात रंग फिका पडण्याची शक्यता असल्यामुळे धुतल्यानंतर हे कपडे सावलीत वाळवावेत. गडद रंगाचे कपडे वेगळे धुवावेत. कधीही ब्लीच किंवा केमिकलचा वापर करू नये. यामध्ये मसराईज, खादी कॉटन, लेनिन खादी, रंगीत खादी असे प्रकार आहेत. मसराईज या खादीच्या प्रकारात फक्त पांढऱ्या रंगाचे कापड येते.
लेखिका फॅशन डिझायनर आहेत.




























































