
सामना ऑनलाईन,मुंबई
केंद्रीय आरोग्य खात्याने महाराष्ट्रात पोलिओ अॅलर्ट जारी केला आहे. उत्तर प्रदेशातील दूषित लसी महाराष्ट्रातील बालकांना पाजण्यात आल्यावर आज केंद्रीय आरोग्य विभागाने शिक्कामोर्तब केले आहे. दूषित लस पाजलेल्या बालकांचा तातडीने शोध धेण्याचे आदेश केंद्रीय आरोग्य विभागाने दिले आहेत. संपूर्ण जगातून ‘टाइप टू’च्या पोलिओचे उच्चाटन झाले आहे. पण उत्तर प्रदेशातील गझियाबादमधील एका कंपनीने उत्पादन केलेल्या लसींमध्ये टाइप टू पोलिओचा ऑक्टिव्ह व्हायरस (विषाणू) सापडला आहे.
महाराष्ट्रात अॅलर्ट
महाराष्ट्र, तेलंगणा व उत्तर प्रदेशातील बालकांना अशी दूषित लस पाजण्यात आल्याचे उघड झाल्याचे केंद्रीय आरोग्य खात्याने मान्य केले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या तीन राज्यांमध्ये अॅलर्ट जारी केला आहे. महाराष्ट्रातील बालकांमधील लक्षणांवर लक्ष ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रासह इतर दोन राज्यांत दूषित लसींचा पुरवठा झाला असला तरी घाबरण्याचे कारण नाही. ज्या बालकांना दूषित लस देण्यात आल्याचा संशय आहे त्या भागात तपासणी मोहीम राबविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. बालकांमध्ये पोलिओची लक्षणे शोधण्यासाठी टीम तयार करण्याचे आदेश केंद्रीय आरोग्य विभागाने राज्याच्या आरोग्य विभागाला दिले आहेत.
एक लाख लसींमध्ये व्हायरस
आतापर्यंत पन्नास हजार लसींमध्ये टाइप टू पोलिओचा ऑक्टिव्ह विषाणू आढळून आला आहे. दूषित लसींची एकच बॅच आढळून आली असली तरी अजून एक लाख लसींची दुसरी बॅच आहे. त्यात टाइप टू पोलिओचे विषाणू मिसळले असण्याची शक्यता नाकारता येत नाही असा संशय आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
शौचात सापडले विषाणू
उत्तर प्रदेशातील बालकांच्या शौचामध्ये टाइप टूचे विषाणू आढळून आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे खळबळ माजली आहे. त्यानंतर काही लसींची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आल्यावर दूषित लसींचा पुरवठा झाल्याचे उघड झाले.
निर्धास्त राहा
या लसींच्या बॅचपैकी महाराष्ट्रात एकही लस वितरित झालेली नाही असे राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले. त्यामुळे महाराष्ट्राला पोलिओचा कोणताही धोका नाही, निर्धास्त रहा अशी ग्वाही आरोग्यमंत्र्यांनी दिली. केंद्र सरकारच्या लसीकरण विभागाचे उपायुक्त डॉ. हलदर यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी लोकांना आश्वस्त केले आहे.
कंपनी संचालकाच्या विरोधात गुन्हा
महाराष्ट्र, तेलंगणा व उत्तर प्रदेशात दूषित लसींचा पुरवठा झाल्याच्या घटनेनंतर बायोमेड कंपनीच्या लसींचे वितरण थांबविण्यात आले आहे. या कंपनीच्या पाच संचालकांपैकी एका संचालकाला अटक करण्यात आली आहे. उर्वरित चार संचालकांची गरज पडल्यास चौकशी करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. एका संचालकाच्या विरोधात गुन्हाही दाखल झाला आहे. मार्च 2014 मध्ये हिंदुस्थान पोलिओमुक्त झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे, पण महाराष्ट्रात पोलिओचा व्हायरस घुसल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
























































