सत्ताधारी पक्षाशी संबंध असेल तर ‘सौ खून माफ’, राम कदमांवर सीएमचे मौन!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

भाजपचे आमदार राम कदम यांनी मुलींना पळवून नेण्याचे वक्तव्य केले हा गंभीर विषय आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृहखाते आहे मात्र आजपर्यंत त्यांनी यावर एकही शब्द काढला नाही किंवा त्या संदर्भात कोणतेही विधान केले नाही. सत्तेत असलेले जर अशी भाषा करतात हे मोठे दुर्दैव असून सरकारचे मोठे अपयश आहे. तुम्ही सत्ताधारी पक्षाशी संबंधित असाल तर तुम्हाला सौ खून माफ असे चित्र निर्माण झाले आहे, असे सुप्रीया सुळे म्हणाल्या. नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले.

शेतकऱ्यांवरील लाठीचार्ज दुर्दैवी
दिल्ली येथे गांधी जयंतीच्या दिवशी शेतकऱ्यांवर झालेला लाठीचार्ज ही अतिशय दुर्दैवी बाब असून याची सरकारला किंमत मोजावी लागणार आहे. तसेच भाजप सरकार पारदर्शी आहे असे म्हणत असेल तर त्यांनी रफेल प्रकरणाची चौकशी जेपीसी मार्फत करावी अशी आमचे आजही भूमिका आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच राज्य सरकारने खऱ्या अर्थाने काम केले असेल तर आमची कुठेही कोणत्याही वेळेला चर्चेची तयारी आहे, मुख्यमंत्र्यांनी आम्हाला वेळ तारीख द्यावी असे सुळे यांनी यावेळी स्पष्ट केले.

मराठी कळतं ना?
शरद पवार यांनी राफेल प्रकरणी पंतप्रधान मोदी यांना क्लिन चिट दिल्याच्या बातमीवर बोलताना सुप्रीया सुळे यांनी वक्तव्य करण्याचे टाळले. राफेल संदर्भात शरद पवार यांची ज्यांनी मुलाखत पाहिली नाही, तसेच ज्यांना मराठी कळत नाही त्यावर काय भाष्य करायचे असेल असा टोला त्यांनी लगावला.

आमच्या काळातही शेतकऱ्यांच्या आत्महत्या पण…
शेतकरी आत्महत्यांबाबत बोलताना सुप्रीया सुळे म्हणाल्या की, आमच्या काळातही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या हे वास्तव आहे मात्र या सरकारच्या काळामध्ये सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. आम्ही सत्तेत असताना त्या वेळेला हेच भाजपवाले आत्महत्या संदर्भामध्ये सरकार वर 302 गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत होते. आता आमचा हाच विषय आहे की यांच्या राज्यात सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत, तर 302 कोणावर दाखल करायचा असा सवालही सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.