बलात्कारपीडितेची फेसबुक विरोधात न्यायालयात धाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। टेक्सास

अमेरिकेतील टेक्सास येथे एका बलात्कारपीडितेने फेसबुक विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. फेसबुक मित्राने आपल्याला मारहाण केली व नंतर बलात्कार केला. त्यानंतर या घटनेचा व्हिडीओ सोशल साईटवर पोस्ट करून देहविक्रीच्या व्यवयायात ढकलले असा आरोप तिने केला आहे. फेसबुकवर महिलांशी मैत्री करुन त्यांचे लैंगिक शोषण करणाऱ्या त्या नराधमाची फेसबुकने नीट तपासणी केली नाही. तसेच अशा प्रकारच्या लोकांपासून सावध राहण्याचा इशाराही फेसबुकने दिला नाही. यामुळे आपले आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचे तिने आरोपात म्हटले आहे.

पीडित महिलेची सहा वर्षापूर्वी फेसबुकवर एका इसमाशी मैत्री झाली. त्याच्या फेसबुक प्रोफाईलमध्ये महिलेच्या म्युच्युअल मित्रांचेही फोटो दिसत असल्याने तिने त्याच्याशी मैत्री केली होती. त्यानंतर दोघेही मेसेंजरवर गप्पा मारू लागले. तरुणीला आकर्षित कऱण्यासाठी तो तिच्या आईबरोबरही बोलू लागला. पण नंतर एके दिवशी भेटण्याच्या बहाण्याने त्याने तिला घरी बोलावले व बलात्कार केला. पण जर फेसबुकने आरोपी युजरची योग्य ती माहिती दिली असती तर माझी फसवणूक झाली नसती. असा आरोप या पीडितेने केला असून याप्रकरणी फेसबुकवर खटला दाखल केला आहे.