संघर्षातून फुललेलं स्मितहास्य…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनुराधा राजाध्यक्ष,[email protected]

स्मिता भागवत. लेखिका, समुपदेशक. संघर्ष हा त्यांच्या प्रतिभेचा पाया. याच पायावर त्यांचं घर… त्यांची लेखणी उभी राहिली.

स्मिताताईंची आणि माझी पहिली भेट झाली, त्यांच्या एकसष्टीला.. ‘कथा सहप्रवासिनीची’ ही त्यांची कथा मी तेव्हा वाचली होती. मला शाबासकी देताना त्या म्हणाल्या होत्या, ‘माझी कथा माझ्यापेक्षा कुणी चांगलं सांगू शकत नाही असं वाटत होतं मला, पण एक सुजाण वाचक, लेखक आणि अभिनेत्री असल्यामुळे माझ्यापेक्षाही तू कथा उंचीवर नेऊन ठेवलीस.’ खूप आनंद झाला होता तेव्हा… या मुलाखतीच्या निमित्तानं पुन्हा त्यांच्याशी बोलताना त्यांच्या प्रचंड लिखाणामागचा भावनिक कल्लोळ अनुभवला. वर वर शांत दिसणाऱया समुद्राचा थांग लागत नाही. तसाच संसारातल्या अंतर्गत वादळांचा मागमूसही बहुतांशी कुणाला दिसत नाही.

गेली पस्तीस वर्षे या क्षेत्रात स्मिताताई देश-विदेशात सातत्यानं काम करत आहेत. त्या सत्यघटनांवर आधारित कथा, कादंबऱयाचे लेखन त्यांनी केलं आहे. शारीरिक, मानसिक आणि वैचारिक समस्यांना स्वतःही सामोऱया गेल्यामुळेच घराघरातल्या वेदनांची हाक त्यांना ऐकू यायला लागली. म्हणून त्या गुजरात समाचारमध्ये ‘कलमद्वारा काऊन्सिलिंग’चं सदर लिहायला लागल्या. त्या म्हणाल्या, ‘लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते या बहिणाबाईंच्या ओळी मला तंतोतंत लागू पडत होत्या. माझे आई-वडील स्वातंत्र्यसेनानी! माहेरी अत्यंत सुसंस्कृत वातावरण! आईला अटक झाली तेव्हा मी तिच्या अंगावर असल्यानं मीही कारावास भोगला. मी माहेरची विजया कप्तान! हे आडनाव माझ्या पणजोबांना त्यांच्या पराक्रमामुळे सयाजीराव गायकवाडांनी दिलं होतं. विजयानं फक्त विजय पाहिला. स्मिता सासरचं नाव. तिला हसून पराभव पचवावा लागला. माझे वडील आणि सासरे स्वातंत्र्य चळवळीत एकत्र कारावास भोगल्यानं मित्र होते. स्वातंत्र्य मिळाल्यावर राजकारण सोडलेले! खूप वर्षांनी वडील अहमदाबादला गेले तेव्हा दोघं रस्त्यात भेटले. फूटपाथवर त्यांच्या गप्पा रंगल्या. त्यात त्यांनी आमचं लग्न ठरवलं.

आम्ही दोघं भेटलो 30 जूनला! नऊ जुलैला लग्न झालं. भेटीवेळी ते इंग्लिश भाषेत बोलले. मला वाटलं, मला इंग्लिश येत नाही असं वाटतं की काय यांना? म्हणून मीही! आणि पहिल्या रात्री वास्तव जाणवलं- नवऱयाला मराठी कळत नाही आणि मला गुजरातीचा गंध नाही. सहा महिने धड संवाद होऊ शकला नाही. आत्ताच्या काळात असा भाषेचा प्रश्न इंग्लिश बोलून सोडवतात. पण तो काळ वेगळा होता. माझी समस्या ओळखून सोसायटीत राहणाऱया स्वातंत्र्यसेनानी आणि वडीलांचेही मित्र असलेल्या ज्ञानपीठ पुरस्कृत उमाशंकर जोशी, बालसाहित्यात अग्रणी रमणलाल सोनी आणि विख्यात समीक्षक नगीनदास पारेख या दत्तगुरूंनी गुजराती शिक असा आग्रह धरला. अभिजात साहित्य वाचायला दिलं. योग्यवेळी हाती लेखणी दिली. कारण लिहित नसते, तर मी आत्महत्या केली असती, वेडी झाले असते वा घटस्फोट नक्की घेतला असता, अशी क्रौर्याची परिसीमा घरात होती. पण हे सुधारण्याची आशा नष्ट होईतो मी एका मुलीची आई झाले होते.

1982 साली अहमदाबाद सुटलं. विचारांची कास धरून 1983 साली मी गुजरात समाचारमध्ये ‘कलमद्वारा काऊन्सिलिंग’ ही लेखमाला सुरू केली. समाजात पीडितांना आउटलेटची संधी नव्हती, ती स्त्रियांना नि पुरुषांनाही मिळाली. वाचकांच्या मनात स्मिता भागवत आपलं दुःख चव्हाटय़ावर मांडून आगीतून फुफाटय़ात टाकणारी व्यक्ती नाही, असा विश्वास निर्माण झाला. तो माझ्या प्रास्ताविक लेखामुळे! दोन युनिव्हर्सिटींनी मला ‘100 केसेसचा रिपोर्ट द्या. आम्ही तुम्हाला डॉक्टरेट देतो’ असं कळवलं. पण मला या पदवीचं आकर्षण नव्हतं. माझ्या प्रकृतीची वाट लागली, तशी कुणाची लागू नये, हाच विचार अग्रभागी असल्यानं मी केसेसना कथेचं आणि कादंबरीचं आवरण घालून, शुगर कोटेड क्वीनाईनसारखी समस्या वाचकांपर्यंत पोहोचवू लागले. गुजरातमध्ये असताना वाटायचं, गुजराती समाज कॉन्जरवेटीव्ह असल्यानं तिथे या समस्या आहेत. पण मुंबईला बदली झाल्यावर जाणवलं की, मी मराठी समाज समजले ते माझ्या वडिल आणि काकांचं सुसंस्कृत मित्रवर्तुळ आहे. मराठी समाजातही दाहक समस्या आहेत. म्हणून मी ‘स्त्री’ मासिकाच्या संपादिका मृणालिनी चितळे यांना भेटले. 1990पासून ‘व्यथा व्यक्त होताना’ हे सदर लिहायला लागले. आवाका मोठा असलेल्या कथा दोन भागात लिहिल्या.

पी जी वूड हाऊस यांना एकानं विचारलं होतं, ‘तुम्ही आत्मचरित्र कधी लिहिणार?’ त्यावर ते म्हणाले होते, ‘मग आजवर मी काय करतो आहे?’ या उदाहरणातून मला स्मिताताईंच्या बोलण्याचा रोख कळला. कथा-कादंबरीतील पात्रं, लिहिणाऱयाच्या अनुभव आणि विचारांना सामावतात.  कॅनडातल्या वुमेन्स प्लेसमध्ये समुपदेशनाचं ट्रेनिंग घेऊन त्यांनी काम केलं. केवळ समुपदेशानाविषयीच नव्हे तर विविध विषयांवर त्यांनी ‘मी एक खारोटी’, ‘नात्याची वीण सांधताना नि उसवताना’, ‘तिची कथाच वेगळी’, ‘सारे जहाँ से अच्छा’, ‘रंग दे बसंती चोला’, ‘पावन प्रीतीच्या रक्तिम सावल्या’ अशी स्वतंत्र पुस्तकं, 3 गुजराती पुस्तकांचा अनुवाद, अशी 27 पुस्तकं मराठीत लिहिली. गुजरातीत तीस पुस्तकं लिहिली. शिवाय आगामी पुस्तके येतीलच. या साहित्य संपदेला महाराष्ट्र आणि गुजरात राज्य पुरस्कारांसोबत इतर एकूण 47 पुरस्कार मिळाले. कॅनडा दूरदर्शनच्या डब्ल्यू चॅनेलवर एक हाती अर्धा तास कार्यक्रम देणारी पहिली एशियन, असं स्पृहणीय काम करणाया स्मिताताई… त्यांच्या कथा-कादंबऱयांना अनुभवाची सुवर्णकडा आहे. ती वेदनांच्या ग्रहणानं ग्रासलेली आहे. त्यांचा लेखणीचा प्रवास म्हणजे आशावादाचा निरंतर ध्यास. त्या भले म्हणोत की विजया कप्तान ही विजयी होती आणि स्मिता म्हणजे हसून पराभव पचवणारी आहे, तरीही त्यांच्या आजवरच्या लेखन आणि समुपदेशनाच्या अखंडित कार्यानं आयुष्य कृतार्थ झाल्याची स्मितरेषा त्यांच्या चेहऱयावर मला सतत दिसत होती हे निश्चित.