कोळंब पुलावरून २० ऑक्टोबरनंतर वाहतूक बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
सामना प्रतिनिधी। मालवण 
सागरी महामार्गावरील अत्यंत महत्वाच्या अश्या कोळंब पुलाची डागडुजी वर्षभर सुरू असून सुमारे दीड वर्ष पुलावरून अवजड वाहतूक बंद आहे. पूल दुरुस्ती अंतिम टप्प्यात असून येत्या २० ऑक्टोबरनंतर पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णतः बंद केली जाणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संकल्प चित्रमंडळ (पूल) विभागाच्या उपअभियंता सोनबरसे यांनी गुरुवारी कोळंब पुलाची पाहणी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. तर डिसेंबर अखेरपर्यंत कोळंब पूल वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.
कोळंब पूल वाहतुकीस धोकादायक बनल्याने या पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली होती. अन्य छोट्या वाहनांची ये-जा पुलावरून सुरू आहे. पुलाच्या दुरुस्तीचे काम संथगतीने होत असल्याने स्थानिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. हे पूल वाहतुकीस धोकादायक असल्याने त्याच्या दुरुस्तीच्या निधीत वाढ करण्यात आली. पावसाळ्यात दुरुस्तीचे काम बंद असल्याने पावसाळ्यानंतर या पुलाचे काम युद्धपातळीवर केले जाणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले होते.
या पार्श्‍वभूमीवर आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संकल्प चित्रमंडळ (पूल) विभागाच्या उपअभियंता  सोनबरसे यांनी पाहणी केली. यावेळी बांधकामचे अभियंता प्रकाश चव्हाण, प्रदीप पाटील यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. या पाहणीनंतर येत्या २० ऑक्टोबरनंतर केव्हाही या पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णतः बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
ग्रामस्थ प्रवाश्यांची होणार गैरसोय
कोळंब पुलाच्या डागडुजीसाठी पूल बंद केला जाणार असल्याने कोळंब, सर्जेकोट, रेवंडी, हडी तसेच आचरा, देवगड मार्गवरील ग्रामस्थ प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. येथे जाण्यासाठी ओझर- कातवड व छोट्या आडारी मार्गाचा अवलंब प्रवाशांना, स्थानिकांना करावा लागणार आहे.