घरफोडी करणारी अट्टल दुकली गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

शहरातील विविध ठिकाणी काळोख्या रात्री शिताफीने घरफोडी करून पसार होणारी दुकली अखेर एमएचबी पोलिसांच्या हाती लागली आहे. त्या दोघांकडून सात गुह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.

दहिसर पश्चिमेकडील आयसी कॉलनी परिसरात घरफोडीचे गुन्हे अधूनमधून घडत होते. याची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत ठाकरे यांनी परिसरात गस्त वाढवून उपनिरीक्षक विजय धोत्रे व त्यांच्या पथकांना वॉच ठेवण्यास सांगितले होते. त्यानुसार धोत्रे व त्यांचे पथक रात्रीची गस्त घालत असताना दोन इसम पोलिसांची गाडी बघून पळू लागले. त्यामुळे पोलिसांनी पाठलाग करून मकसूद ऊर्फ फिरोज मोहम्मद सिद्दिकी शेख (23), अजिम अजीज अली (27) यांना ताब्यात घेतले. दोघांची अंगझडती घेतली असता स्प्रू ड्रायव्हर, पाना, पक्कड मिळाले. तसेच चौकशीत त्यांनी एमएचबी कॉलनी परिसरात तीन तर बोरिवली, मालाड, खार, व्ही. पी. रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडय़ा केल्याची कबुली दिली. आरोपींकडून लॅपटॉप, कॅमेरा, रोकड असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 बंद दुकान लुटणाराही सापडला

मुंबई व ठाणे शहरातील बंद दुकानांचे शटर उचकटून हातसफाई करणाऱया अट्टल चोराच्या दादर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. सय्यद अहमद मस्तान शेख ऊर्फ अली असे त्याचे नाव असून दादर पोलिसांनी त्याला मानखुर्द येथील त्याच्या राहत्या घरातून उचलले. त्याने दादर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन तर ठाणे शहरात 23 घरफोडय़ांचे गुन्हे केले.