
सामना प्रतिनिधी । मुंबई
देशभरातील सहाशे तर महाराष्ट्रातील 80 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यासाठी केंद्रीय संस्था म्हणून ‘भारतीय रेल्वे स्थानक विकास महामंडळ’ अर्थात ‘आयआरएसडीसीएल’ची निवड करण्यात आली आहे. ही स्थानके विमानतळाच्या धर्तीवर चकाचक होणार असून प्रवाशांना तेथे विविध जागतिक दर्जाच्या सुविधा पुरविण्यात येणार आहेत.
जून 2015 मध्ये रेल्वेने प्रथम ही योजना जाहीर केली होती. त्यावेळी ए-1 व ए दर्जाच्या स्थानकांचा विकास करण्यात येणार होता. मात्र, त्यावेळी 45 वर्षांच्या लीजवर विकासकांना रेल्वे स्थानकाचा विकास करण्याची मर्यादा घालण्यात आली होती. मात्र त्यास प्रतिसाद न मिळाल्याने लीजची मर्यादा वाढवून 99 वर्षांपर्यंत करण्यात आली आहे. सुमारे 600 रेल्वे स्थानकांचा व त्यांच्या आजुबाजूच्या परिसराचा विकास त्यात अंतर्भूत आहे. त्याकरिता 1 लाख कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
या स्थानकांवर प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा देण्यात येणार असून रेल्वेच्या जमिनींचा व्यावसायिक वापर करण्याची परवानगी कंत्राटदारांना मिळणार असून त्यांना स्थानकाची एअर स्पेसही वापरता येणार आहे. ही स्थानके स्मार्ट स्थानके म्हणून एखाद्या मिनिस्मार्ट सिटीसारखी काम करणार आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळून रोजगारातही वाढ होणार आहे.
या रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट
फेज एक – लोकमान्य टिळक टर्मिनल, ठाणे, मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस, बोरिवली आणि पुणे
फेज दोन – 4 स्थानके – कल्याण, नाशिक रोड, अमरावती आणि सोलापूर
अपग्रेडेशनमध्ये राज्यातील 6 स्थानके
फेज एक – अकुर्ली, नागपूर, लोकमान्य टिळक टर्मिनस, भुसावळ, पुणे आणि वडाळा रोड
आयआरएसडीसीएलद्वारा – पुणे, नागपूर रेल्वे स्थानक
आरएलडीए/ एनबीसीसीद्वारा – नवीन ठाणे स्थानक




























































