ठसा : पं. तुळशीदास बोरकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
तुळसीदास बोरकर,हार्मोनियम वादक

>>प्रशांत गौतम<<

संगीताच्या मैफलीत संवादिनीस स्थान मिळवून देणारे, सर्वस्व मानणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हार्मोनियम वादक पं. तुळशीदास बोरकर गेले आणि संवादिनी अबोल झाली. त्यांनी आपल्या बोटांच्या जादुई स्पर्शाने हार्मोनियमला बोलायला लावले. आज तेच स्वर मूक झाले आहेत. पद्मश्रीसह संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित झालेल्या तुळशीदास यांचा जन्म गोव्यातील बोरी येथे 1934 साली झाला आणि हा सुरेल प्रवास 83व्या वर्षी थांबला. बोरकरांच्या घरातच संगीतमय वातावरण होते. आई जयश्रीबाई उत्तम गाणे शिकलेल्या होत्या. बहीण नलिनी स्वरराज छोटा गंधर्व यांच्या कला विकास नाटय़संस्थेत काम करायच्या. त्यामुळे बोरकरांना संगीत-नाटय़ शिक्षणाचे बाळकडू लहान असतानाच लाभले. प्रत्यक्ष मातोश्रीस त्यांनी संवादिनी वाद्यातील गुरू मानले होते. पुढील काळात ऑर्गनवादक विष्णुपंत वष्ट हे त्यांच्या स्वरमयी प्रवासात गुरू लाभले. बोरकर लहानपणी कीर्तन ऐकायचे. कीर्तनातील संवादिनीचे सूर त्यांनी परिश्रमपूर्वक जतन करून ठेवले होते. या बाबतीत बोरकर नेहमी म्हणत- संवादिनी हेच माझे सर्वस्व आहे. माझा श्वास आहे. त्यांच्या बोटात दैवजात जादू दडलेली होती, म्हणूनच त्यांची ओळख संवादिनीस बोलतं करणारे हार्मोनियम वादक अशी झाली होती, जी त्यांनी शेवटपर्यंत जपली, कायम ठेवली. ज्येष्ठ गायक उस्ताद अमीर खाँ, स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी, पं. मल्लिकार्जुन मन्सूर, पं. जितेंद्र अभिषेकी, गान सरस्वती किशोरी अमोणकर, स्वरराज छोटा गंधर्व, पं. राजन आणि साजन मिश्रा अशा कितीतरी दिग्गजांच्या रंगलेल्या मैफलीत पं. तुळशीदास यांनी आपल्या बहारदार संवादिनीच्या साथ संगतीने रंग भरले. स्वरराज छोटा गंधर्व यांच्याकडे शिकत असतानाच नाटकात संगीत साथ देण्याचेही धडे त्यांनी गिरवले. या प्रवासात मधुकर पेडणेकर यांच्यासोबत तब्बल एक दशक घालवता आले आणि यातूनच त्यांचा संवादिनी शिक्षणाचा मार्ग पुढील काळात बहुआयामी होत गेला. पं. बोरकर यांनी संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गजांसोबत साथसंगत प्रदीर्घ काळ केली होती. त्यामुळे त्यांना या प्रवासात अनेकांकडून खूप काही शिकता आले. प्रत्येक कलाकाराच्या रंगत जाणाऱ्या मैफलीत त्यांच्या गायनासोबत संवादिनीची साथ करणे, त्यांचे स्वभाव, गुणविशेष कौशल्य आत्मसात करणे यासारख्या किती तरी बाबी शिकता आल्या. या सर्वांचे सान्निध्य आलेले अनुभव त्यांनी ‘संवादिनी साधना’ या पुस्तकात विस्ताराने मांडले आहेत. ज्याच्या अभ्यास या क्षेत्रात नव्याने येणाऱ्या कलावंतांनी आवर्जून केला पाहिजे. मोठमोठय़ा गायकांसोबत त्यांनी साथ संगत केलेली असल्याने मैफलीत कलावंतांसमोर बोरकरांशिवाय अन्य कोणताही पर्याय नसायचा. गायनाची मैफल बहारदार करण्यासाठी बोरकरांची संवादिनी साथसंगत ही हवी, असा कलाकारांचाही प्रेमळ आग्रह असायचा. यावरूनच पं. तुळशीदास यांच्या गुण विशेषांचे महत्त्व अधोरेखित होते. तेरा वर्षांचे वय असल्यापासून त्यांचे संवादिनीवर साथसंगत करणे सुरू होते. छोटा गंधर्व यांच्या ‘संगीत देवमाणूस’ यात त्यांनी सर्वप्रथम साथसंगत केली. गोव्यातून पुण्यात बराच काळ संगीत साधना केली. तेथील वास्तव्यात असताना पानशेतचे धरण फुटले आणि त्या पुरात बोरकर यांचे सर्वस्व वाहून गेले. पुण्यातून मुंबईला आल्यावर त्यांच्या प्रवासाची सुरुवात झाली. मुंबई महापालिकेत संगीत शिक्षक म्हणून ते नोकरी करीत आणि नोकरी सांभाळून त्यांनी आपली आवड जोपासली. वाढवली. आयुष्याच्या उत्तरार्धातही त्यांचे ज्ञानदानाचे कार्य सुरूच होते. संगीत क्षेत्रातील भरीव, ठसठशीत योगदानाबद्दल पं. बोरकर यांना पद्मश्री,  मास्टर दीनानाथ मंगेशकर, भारत गायन समाज, अ.भा. नाटय़ परिषद, अ.भा. गांधर्व महाविद्यालय, पं. राम मराठे, संगीतकार वसंत देसाई संगीत नाटक अकादमी पुरस्कार, गोवा शासनाचा सन्मान लाभला होता. त्यांनी आपल्या सुरेल संवादिनी वादनाने संगीत रसिक, जाणकार यांना आनंद दिला.