
सामना ऑनलाईन, नांदेड
राज्य शासनाने परभणी, हिंगोली, धाराशिव, सांगली, भंडारा आणि अकोला जिल्ह्यांसाठी पालक सचिवांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. सामान्य प्रशासन विभाचे अपर मुख्य सचिव बिपीन मल्लीक यांच्या स्वाक्षरीने हे आदेश पारित झाले आहेत .
राज्य शासनाने 2015 ते जुलै 2018 दरम्यान पंधरा विविध आदेश काढून त्याद्वारे राज्यातील जिल्ह्यांमध्ये पालक सचिवांच्या नियुक्त्या केल्या. राज्यात चालणाऱ्या लोकशाही दिनातील अर्ज आणि त्यावरील प्रभावी अंमल शासनाला महत्वपूर्ण वाटला आणि त्यासाठीच पालकसचिवांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. पुर्वीच्या आदेशांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये पालकसचिवांच्या नियुक्त्या शिल्लक राहिल्या होत्या. त्यातील मराठवाड्यातील 3 पश्चिम महाराष्ट्रातील एक आणि विदर्भातील 2 जिल्ह्यांच्या पालक सचिवांच्या नियुक्त्या शासनाने जाहीर केल्या आहेत.
नवीन नियुक्त्यांमध्ये परभणी येथे महिला व बाल विकास विभागाच्या सचिव विनिता वेद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. धाराशिव येथे पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव अनिल डिग्गीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परभणी येथे लेखा व कोषागारे या वित्त विभागातील प्रधान सचिव एन.आर. गद्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यात अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांची नियुक्ती झाली आहे. भंडारा जिल्ह्यात वस्त्रोद्योग विभागाचे सचिव अतुल पाटणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यात उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय यांची नियुक्ती करण्यात आली आहे.



























































