जीवनानुभूती देणाऱ्या तरल कविता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 >>रमेश नागेश सावंत

गेली 36 वर्षे सातत्याने कविता लिहिणाऱया कवी सूर्यकांत आंगणे यांचे ‘सूर्याच्या साक्षीने’ आणि ‘गुलमोहर’ हे दोन कवितासंग्रह नुकतेच प्रकाशित झाले आहेत. याअगोदर ‘शाळेत जाऊया’ व  ‘प्राजक्ताची फुले’ हे दोन बालकवितासंग्रह आणि ‘मोत्याचा घास’ हा बालकथासंग्रह लिहून बालसाहित्याच्या क्षेत्रातही त्यांनी आपल्या सृजनशीलतेची मोहर उमटविली आहे.  ‘सूर्याच्या साक्षीने ’ आणि ‘गुलमोहर’ या दोन्ही काव्यसंग्रहांना प्रख्यात ज्येष्ठ साहित्यिक ह.शि. खरात यांच्या अभ्यासपूर्ण आणि विवेचक प्रस्तावना लाभल्या आहेत ही कवी आंगणे यांच्यासाठी आणि त्यांच्या कवितेसाठी मोठी गौरवास्पद बाबच म्हणावी लागेल. एकाच वेळी प्रसिद्ध झालेल्या या काव्यसंग्रहांपैकी ‘सूर्याच्या साक्षीने’ या संग्रहातील कवितांची रसदार ओळख करून देताना ह.शि. खरात सर म्हणतात,  सूर्यकांत आंगणे हौस म्हणून कविता लिहीत नसून जगातील दुःख, दारिद्रय़, ढोंग, विषमता व्यक्त करण्यासाठी कविता लिहिण्याची धडपड करीत आहेत. त्यांचा प्रयत्न प्रामाणिक आहे. त्यासाठी ते कसलाही आव आणत नाहीत’. खरात सरांसारख्या जाणकाराने दिलेल्या या अभिप्रायात बरेचसे तथ्य आहे याचे कारण त्यांनी पुढे नमूद केले आहे. त्यांच्या या मतानुसार कवी आंगणे यांच्या साध्या सरळ शैलीतही एक प्रकारची लय असून त्यांची कविता वाचताना आपण कुठेही अडखळत नाही. कवीच्या ज्या ‘स्वप्न’ या कवितेतील काही ओळी खरात सरांनी आपल्या प्रस्तावनेत उद्धृत केल्या आहेत त्याच कवितेतील पुढील ओळीदेखील रसिकांच्या मनात घर करून बसतात.

‘लेखणीतल्या शब्दांना यावी ज्ञानमयी धार

त्यांनी घडवावा नवा इतिहास अन् चमत्कार!’

असे सरळ साध्या शब्दांतून व्यक्त होणे आणि तरीही त्या कवितेतील आशय आणि अर्थ टिकवून ठेवणे हे कवी आंगणे यांच्यासारख्या कवीनांच जमू शकते. या संग्रहातील सर्व कवितांमध्ये कवी आंगणे यांनी हीच लय टिकवून ठेवली आहे ज्यामुळे वाचक त्यांच्या कवितांचा आस्वाद घेत घेत त्यांच्या काव्यशैलीत कधी डुंबून जातो ते कळत नाही. या संग्रहात त्यांच्या एकूण 61 कविता असून ‘युग’, ‘दाम’, ‘माझी आई’ , ‘वाट का अडते’, ‘खंत’ या कवितांमध्ये त्यांनी अभंग वृत्ताचा वापर केलेला आहे. इतर सर्व कविता जरी मुक्त छंदात असल्या तरी त्यापैकी बहुतेक अल्पाक्षरी कविता वाचनीय आणि माननीय झाल्या आहेत. आपल्या पहिल्या काव्यसंग्रहात बहुतेक कवींना पहिल्या प्रेमाची अनुभूती व्यक्त करण्याचा मोह पडतो. कदाचित यामुळेच की काय कवी आंगणे यांनीही ‘आसवांचे थेंब’ या कवितेत प्रेमभावना अतिशय तरल शब्दांत व्यक्त केली आहे.

‘हृदयातल्या भावनांना

आवरावे कसे मी

डोळ्यांतल्या तुझ्या

छबीला सावरावे कसे मी’

कोणत्याही भावना इतक्या उत्कटपणे व्यक्त करताना कवी आंगणे शब्दांचा तोल आणि कवितेचे मोल कमी होऊ देत नाहीत. याचे प्रत्त्यंतर या संग्रहातील ‘रडतेय धरती माय’, ‘आम्ही शेतकरी’, ‘या इथे,’ ‘सूर्याच्या साक्षीने’, ‘सुखाई’ या कवितांतून येते. अशा इतर अनेक कविता या सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणाऱया असल्या तरी त्या रटाळ किंवा आक्रस्ताळ्याही झालेल्या नाहीत हे कवी आंगणे यांच्या कवितालेखनाचे एक वैशिष्टय़ आहे.

कवी आंगणे यांचा ‘गुलमोहर ’ हा दुसरा कवितासंग्रह ‘पाऊस’ आणि ‘निसर्ग’ यांच्यावर बेतलेल्या एकूण 53 कवितांनी बहरलेला आहे. त्यामुळे पहिल्या काव्यसंग्रहाच्या तुलनेत हा संग्रह अधिक बहारदार आणि तितकाच वाचनीय झाला आहे. या कवितासंग्रहाला देखील प्रख्यात ज्येष्ठ साहित्यिक ह.शि.खरात यांची आस्वादक आणि अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभली आहे. खरात सर यांनी या कवितासंग्रहाचे नेमके वैशिष्टय़ आपल्या प्रस्तावनेत पुढीलप्रमाणे नमूद केले आहे. ‘कवी सूर्यकांत आंगणे यांचा ‘गुलमोहर’ काव्यसंग्रह आपल्याला थेट निसर्गात घेऊन जाणारा आहे. या कवितासंग्रहात प्रेमासंबधीचे नैराश्य आढळत नाही तर निसर्गाच्या सान्निध्यात त्यांच्या प्रेमाला बहर आल्यासारखा वाटतो.’

कोणत्याही कवीला खुणावत असलेल्या सुंदर निसर्गाचे विलोभनीय रूप कवी आंगणे यांच्यातील कवीनेही आपल्या कवितांतून सुरेख रेखाटले आहे. या संग्रहातील पहिल्याच ‘गुलमोहर’ या कवितेत त्यांनी म्हटले आहे, ‘गुलमोहराच्या सहवासातच माझे जीवन फुलत आहे.’ निसर्गाशी तादात्म्य पावण्याची त्यांची ही मनोवृत्ती ‘वृक्ष’, ‘श्रावण निसर्ग दान’, ‘श्रावण’, ‘मानव’ आणि ‘हिरवे झाड’, ‘भूमाता’ आणि ‘निसर्ग’ अशा अनेक कवितांमधून दिसून येते. इतर कवितांपैकी बहुतांश कविता मानवी मनाला मोहविणाऱया पावसावर लिहिलेल्या आहेत ज्यातून पाऊस आणि त्याच्या विविध छटा या मनस्वी कवीने मनाला भावणाऱया शब्दकळा वापरून रेखाटल्या आहेत. ‘येरे पावसा लवकरी’ या कवितेत पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱया ग्रामीण स्त्राrची आर्त हाक कवी आंगणे यांनी तिच्याच शब्दांत व्यक्त केली आहे.

‘धरेच्या उदरी जन्मू दे नवा कोंब

फळा येऊ दे मानवाची पुण्याई

पाण्यासाठी आतुरली भुई

पाऊस दडला कुठं ग बाई’

अशा तऱहेने एकीकडे पावसाच्या आणि त्यात बहरलेल्या निसर्गाच्या कविता लिहून रसिकांना मोहविणारे कवी आंगणे. दुसरीकडे काही कवितांतून मानवी भावना आणि संवेदनांनाही छेडताना दिसतात. उदाहरण द्यायचे तर  ‘मन’, ‘गीत व्हावे’, ‘जीव तीळ तीळ तुटतो ’, ‘जन्मदात्या ’, ‘नाते’ आणि ‘असा मी’ अशा कविता रसिकांच्या जीवनानुभूती आणि अनुभव यांच्या जवळ जाणाऱया आहेत.

एकुणात ‘गुलमोहर’ या कवितासंग्रहातून कवी सूर्यकांत आंगणे यांच्या कवितेचा ‘गुलमोहर’ अधिकच बहरलेला आढळतो.

चित्रकार  सतीश खोत यांनी या दोन्ही कवितासंग्रहांना आकर्षक आणि साजेसी मुखपृष्ठs चितारली आहेत त्याबद्दल त्यांचे अभिनंदन! कवी सूर्यकांत आंगणे यांना त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

‘सूर्याच्या साक्षीने’ व ‘गुलमोहर’

कवी- सूर्यकांत आंगणे, सिद्धार्थ

प्रकाशन- प्रकाशन,मुंबई