
सामना ऑनलाईन । रायपूर
बेटी बचावचा नारा देणाऱ्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या कार्यक्रमातच महिलांचा अपमान झाल्याची घटना घडली आहे. शहा यांना काळे झेंडे दाखवण्यात येऊ नयेत म्हणून कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या महिलांची अंतर्वस्त्रेही तपासली गेल्याचा आरोप करण्यात येत आहे.
जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, अमित शहा हे छत्तीसगडच्या एक दिवसीय दौऱ्यावर होते. त्यावेळी ते चरौदा येथे होत असलेल्या महिला महासंमेलनालाही उपस्थित राहिले. मात्र, या संमेलनात सामील होणाऱ्या महिलांशी तपासणीच्या नावाखाली गैरवर्तन करण्यात आलं. सुरक्षेच्या नावाखाली त्यांनी परिधान केलेले कपडेही उतरवण्यात आले आणि त्यांची अंतर्वस्त्रेही तपासण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. पण, हे सगळं फक्त काळे झेंडे दाखवू नयेत यासाठी केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या घटनेवर छत्तीसगड काँग्रेसच्या नेत्या किरणमयी नायक यांनी टीका केली आहे. ”आजवर फक्त तरुणांचे मोजे आणि पट्टे उतरवले जात होते. आता अशा प्रकारचं कृत्य महिलांसोबतही होत आहे. महिला सुरक्षेच्या गप्पा मारणाऱ्या भाजप सरकारची हीन दर्जाची मानसिकता या घटनेमुळे उघड झाली आहे. बेटी बढाव, बेटी पढावच्या जागी आता भाजपपासून मुलींना वाचवा, असे नारे आता सुरू झाले आहेत. भाजपचे नेते आणि मंत्री बलात्काऱ्याला संरक्षण देतात”, असा आरोप नायक यांनी केला आहे.
summary- police misbehaved with ladies in amit shah program






















































