बेस्टचा आज अर्थसंकल्प

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई 

आर्थिक खाईत असलेल्या बेस्ट उपक्रमाचा सन 2019-20 चा अर्थसंकल्प आज मांडण्यात येणार आहे. एका बाजूला दिवसेंदिवस वाढत चाललेली आर्थिक तूट असताना दुसऱया बाजूला गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पाला अद्याप पालिका सभागृहाने मंजुरी दिलेली नाही. अशा परिस्थितीत उद्या सोमवारी बेस्ट प्रशासन मुंबईकरांना नक्की अर्थसंकल्पातून काय देणार याकडे सगळय़ांचे लक्ष लागले आहे.

एक लाख रुपये शिलकीचा अर्थसंकल्प मांडण्याची बेस्टची प्रथा आहे, मात्र गेल्या दोन वर्षांपासून महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी कोटय़वधींच्या तुटीचे अर्थसंकल्प सादर केले. हे दोन्ही अर्थसंकल्प पालिका सभागृहाने परत पाठवले. मात्र त्यानंतर पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी बेस्टसाठी जालीम उपाययोजनांचा कृती आराखडा दिला होता. हा कृती आराखडा बेस्ट समितीने मंजूर केला खरा, पण त्यातील गाडय़ा भाडय़ाने घेण्यासारखे काही निर्णय हे कामगार संघटनांनी कोर्टात खेचल्यामुळे रखडले आहेत. याच कृती आराखडय़ातून गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात बेस्ट प्रशासनाने तिकीट दरवाढही सुचवली होती. ती एप्रिल महिन्यापासून लागू झाली. या सगळय़ाच्या पार्श्वभूमीवर उद्या मांडल्या जाणाऱया अर्थसंकल्पात कर्मचाऱयांसाठी काय वाढून ठेवलंय, मुंबईकरांना सेवासुविधा मिळणार की पुन्हा तिकीट वाढ अशी उत्सुकता लागून राहिली आहे.

गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प लटकलेलाच

-सन 2017-18 मध्ये प्रशासनाने 540 कोटी तुटीचा अर्थसंकल्प मांडला.

-तो पालिका सभागृहाने मंजूर केलेला नसतानाच प्रशासनाने सन 2018-19 चा 880 कोटी तुटीचा अर्थसंकल्प मांडला होता.

-ही तूट भरून काढणे शक्य नसल्यामुळे पालिका प्रशासनाने बेस्टला काटकटसरीचे जालीम उपाय असलेला कृती आराखडा सादर केला. हा आराखडा मंजूर करण्याच्या अटीवरच 540 कोटी तुटीचा अर्थसंकल्प मंजूर केला.

-कृती आराखडय़ामुळे बेस्टचे 504 कोटी वाचले. त्यामुळे सन 2018-19 च्या अर्थसंकल्पातील तूट 880 कोटींवरून 376 कोटींवर आली, मात्र ही तूट भरून काढण्यासाठी पालिका प्रशासनाने आपल्या अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद बेस्टसाठी केली नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्प अद्याप लटकलेलाच आहे.