
सामना प्रतिनिधी, मुंबई
येत्या 10 तारखेपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. मुंबईकरांचे आराध्यदैवत असलेली महालक्ष्मी आणि मुंबादेवी ही मंदिरे उत्सवासाठी सज्ज झाली आहेत. दोन्ही ठिकाणी नऊ दिवस चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून सीसीटीव्हींची नजर असेल.
महालक्ष्मी मंदिरात पहाटे 5 वाजता घटस्थापना होऊन त्यानंतर ध्वजारोहण सकाळी 6.30 वाजता आणि आरती सकाळी 7 वाजता होईल. शनिवारी, 13 ऑक्टोबर रोजी ललिता पंचमी पूजन, मंगळवार, 16 ऑक्टोबर रोजी अष्टमी तर 17 ऑक्टोबर रोजी अष्टमी हवन सकाळी 9 वाजता सुरू होऊन पूर्णाहुती दुपारी 12.50 वाजता होईल. नवरात्रोत्सवात महालक्ष्मी मंदिर सकाळी 5 वाजता खुले होऊन रात्री 10 वाजता बंद करण्यात येईल. मंदिराच्या परिसरात आणि हाजी अलीपर्यंतच्या परिसरात 65 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. गावदेवी पोलिसांच्या मदतीला ड्रगनचे सुरक्षारक्षक, वैष्णव चॅरिटेबल ट्रस्ट, अनिरुद्ध ऍकॅडमी, नागरी सेवा दल, होमगार्डस् असतील.
भाविकांसाठी सूचना
महालक्ष्मी मंदिरात भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची, सरबताची तसेच विनामूल्य चप्पल स्टॅण्डची सोय करण्यात आली आहे. भाविकांनी पूजेचे साहित्य प्लॅस्टिकची थाळी किंवा प्लॅस्टिक पिशवीतून न आणता कापडी पिशवीचा वा छोटय़ा परडय़ांचा वापर करावा, असे आवाहन मंदिराचे व्यवस्थापक भालचंद्र वालावलकर यांनी केले आहे.
मुंबादेवी मंदिर पहाटे 5.30 वाजल्यापासून खुले
नवरात्रोत्सवात मुंबादेवी मंदिर पहाटे 5.30 वाजता उघडणार असून रात्री 11 वाजता बंद होईल. 10 ऑक्टोबर रोजी सकाळी 7.30 ते 8 च्या सुमारास घटस्थापना होणार आहे. 17 ऑक्टोबर रोजी रात्री 9.30 वाजता नवमीचे हवन (श्री चंडी महायज्ञ ) होणार असून त्याची पूर्णाहुती 18 ऑक्टोबर रेजी पहाटे 3 ते 3.30 च्या सुमारास होईल. उत्सव काळात सकाळी 5.30 वाजता मंगला आरती, सकाळी 9.30 वाजता मुख्य आरती, नैवेद्य आरती सकाळी 11.30 वाजता, धुपारती सायंकाळी 6.30 वाजता आणि रात्रीची मुख्य आरती 8 वाजता तर शयन आरती 10.45 वाजता होईल. मुंबादेवी मंदिराची सुरक्षा लोकमान्य टिळक पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडे आहे. ड्रेगनचे सुरक्षा रक्षक, मंदिराचे 35 कर्मचारी, मुंबादेवी भक्त मंडळ आणि वैष्णव चॅरिटेबल ट्रस्टचे स्वयंसेवक भक्तांना मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती मुंबादेवी मंदिराचे व्यवस्थापक हेमंत जाधव यांनी दिली.
summary- temple in mumbai are ready for navratri

























































