
सामना ऑनलाईन । पीलीभीत
उत्तर प्रदेशच्या पीलीभीत जिल्ह्यात ज्युवेनाइल कोर्टाने 38 वर्षांपूर्वीच्या हत्या प्रकरणाचा निकाल देत एका आरोपीला हॉस्पिटल आणि पोस्टमॉर्टेम हाऊसची साफसफाई करण्याची शिक्षा सुनावली आहे. 54 वर्षांच्या अल्पवयीन आरोपीला ज्युवेनाइल कोर्टाने शिक्षा सुनावण्याची ही पहिलीच घटना आहे. याआधी या आरोपीला याच प्रकरणात पाच महिने आणि 15 दिवसांचा तुरुंगवास झालेला आहे.
1980 साली पीलीभीत जिल्ह्यातील अल्पवयीन मुलाने आजोबांसोबत भांडणाऱ्या इसमावर चाकूने वार केले होते. त्या इसमाचा 9 दिवसांच्या उपचारानंतर मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून अल्पवयीन मुलाला अटक केली होती. स्थानिक न्यायालयाने मुलाला आजन्म तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. त्यानुसार मुलाने साडेपाच महिने तुरुंगात काढले. त्यानंतर जामीन मिळाल्यावर मुलगा तुरुंगाबाहेर आला आणि त्याने सर्वसामान्यांप्रमाणे आयुष्य सुरू केले.
या घटनेच्या 31 वर्षांनंतर अलाहाबाद हायकोर्टाने घटनेच्या वेळी आरोपी अल्पवयीन होता असे सांगून हे प्रकरण ज्युवेनाइल बोर्डाकडे पाठवले. त्यानंतर शनिवारी या प्रकरणाचा निकाल देण्यात आला. न्या. सुदेश कुमारी यांनी आरोपीला तीन वर्षे जिल्हा इस्पितळाची आणि पोस्टमॉर्टेम हाऊसची सफाई करण्याची शिक्षा सुनावली आहे. एवढेच नव्हे तर हे काम करताना आरोपीला कोणतीही साप्ताहिक सुट्टी किंवा जेवणाची सुट्टी घेण्यास मनाई केली आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे आरोपीचे वकील विवेक पांडे यांनी सांगितले.
summary- man got punished after 38 years


























































