
>>नागोराव सा. येवतीकर<<
आधार सक्ती करणारा हा निर्णय रद्द करण्यात आला. या निर्णयामुळे 122 कोटी जनतेला दिलासा मिळाला आहे. शिवाय आधारकार्ड हे घटनात्मकदृष्टय़ा वैध असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला. यापुढे बँक, मोबाईल किंवा शाळेसाठी आधारकार्डची गरज नाही असे ही स्पष्ट केले. त्यामुळे आधारकार्डचे अतिरेकी महत्त्व राहणार नाही. आधारकार्डने देशात बहुतेक कामात व्यवस्थितपणा आणला हे खरेच, पण शेवटी वैयक्तिक गोपनीयतादेखील तेवढीच महत्त्वाची आहे.
महाराष्ट्रातील नंदुरबार जिह्यातील शहादा तालुक्यातील टेंभली या गावापासून हिंदुस्थानचे तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या उपस्थितीत 29 सप्टेंबर 2010 रोजी आधार कार्ड योजनेला सुरुवात करण्यात आली. याच गावातील रंजना सोनवणे हिला देशातील पहिले आधार कार्ड समारंभपूर्वक कार्यक्रमात वाटप करून आधार योजनेची मुहूर्तमेढ करण्यात आली. आधार कार्डची निर्मिती कशी झाली? ही माहिती खूपच रंजक आहे. 1999 च्या कारगील युद्धानंतर के. सुब्रह्मण्यम यांनी देशाच्या सुरक्षिततेबाबत तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना 7 जानेवारी 2000 रोजी एक अहवाल सादर केला. ज्यात म्हटले होते की, सीमावर्ती भागात राहणाऱ्या लोकांना विशेष ओळखपत्र देण्यात आल्यास हिंदुस्थानात वाढत चाललेली घुसखोरी थांबविता येऊ शकेल. त्यावेळी केंद्रीय मंत्रिमंडळातील ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी या अहवालाचा अभ्यास करून ‘बहुउद्देशीय हिंदुस्थानी ओळखपत्र’ या नावाने ओळखपत्र वाटप सुरू करण्याची घोषणा केली. सर्वात पहिल्यांदा सीमावर्ती भागातील लोकांना या ओळखपत्राचे वाटप करून त्यानंतर देशात सर्वत्र वाटप केले जावे असे ठरविण्यात आले. आधार कार्डची बीजे ही अशी वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात पडली होती असे दिसून येते. कदाचित याच घटकाचा विचार करून डॉ. मनमोहन सिंग सरकारने आपल्या कारकीर्दीत आधार संकल्पना पूर्णत्वास नेली असावी असे वाटते.
देशातील सर्व नागरिकांना एकच क्रमांक देण्यात यावा आणि देशात कुठेही त्याला स्वतःची ओळख देता यावी म्हणून शासनाने फेब्रुवारी 2009 मध्ये आधार कार्ड योजनेची संकल्पना तयार केली. या योजनेवर काम करण्यासाठी व त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी नंदन निलकेनी यांची चेअरमन म्हणून निवड करण्यात आली. ही जबाबदारी त्यांच्यावर जून 2009 मध्ये सोपविण्यात आली होती. आधार कार्डचे प्रणेते म्हणून आज आपण त्यांचेच नाव घेतो. त्यांनी अथक परिश्रम घेऊन आधार कार्ड लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले. सदरील योजना प्रत्यक्षात राबविण्यापूर्वी श्रीकांत नथामुने, सलिल प्रभाकर, आर. एस. शर्मा, प्रमोद वर्मा इत्यादी तज्ञ लोकांनी यात अथक परिश्रम घेऊन त्या आधार कार्डाला मूर्त स्वरूप देण्याचे काम केले आहे. या योजनेचा लोगो अतुल सुधाकरराव पांडे यांनी तयार केला असून ज्यावरून निरक्षर व्यक्तीलाही प्रथमदर्शनी पाहिल्याबरोबर त्याची ओळख होते. 2017 पर्यंत हिंदुस्थानातील प्रत्येकाला स्वतःची ओळख होण्यासाठी आधार योजना तयार करण्यात आली. आंध्र प्रदेश व केरळमध्ये आधार कार्ड सर्वात जास्त वाटप करण्यात आले. त्या खालोखाल तेलंगणा, पंजाब, हरयाणा, दिल्ली, हिमाचल प्रदेश, त्रिपुरा, गोवा, पुद्दुचेरी, चंदिगड, सिक्कीम, लक्षद्वीप या प्रदेशाचा क्रमांक लागतो. मेघालय व आसाम या प्रदेशात आधार कार्ड खूप कमी प्रमाणात वाटप करण्यात आले. आपल्याजवळ आधार कार्ड नसेल तर शासनाच्या कोणत्याच योजनेतील अनुदानाचा लाभ मिळणार नाही अशी साशंकता लोकांच्या मनात घर करून आहे. त्यामुळे प्रत्येकजण आधारकार्ड मिळविण्यासाठी धडपड करीत आहे. शासनाने ही योजना सुरुवातीला जनकल्याणासाठीच तयार केली होती; परंतु काही जिह्यातील अत्यंत हुशार आणि तल्लख बुद्धिमत्तेच्या अधिकाऱ्यांनी या आधार कार्डचा वापर करून गरीब लाभार्थ्यांना विविध योजनेचे थेट अनुदान त्यांच्या खात्यावर देण्याचा यशस्वी उपक्रम राबविला. यातून दलाली बंद झाली आणि सामान्य जनता सुखावली. ज्याद्वारे सरकारनेसुद्धा त्याच अनुषंगाने विचार करण्यास सुरुवात केली. 1 जानेवारी 2013 रोजी सर्व योजनांचे अनुदान आधार कार्डशी जोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला. कोणतेही नवीन पक्षाचे सरकार सत्तेवर आल्या आल्या जुन्या शासनाच्या सर्व योजना काही ना काही निमित्त दाखवीत रद्द करते किंवा त्या योजनेचे नाव बदलून टाकते. मात्र आधार ही एक योजना अशी आहे जिचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाने स्वीकार केला आणि त्यास पुढे चालू ठेवण्याचे पाऊल उचलले. आधार कार्डच्या मदतीने बायोमेट्रिक प्रणालीचा वापर शाळा, विद्यालय, कार्यालय अशा विविध ठिकाणी करून कर्मचारी वर्गातसुद्धा सुसंगतपणा आणता येईल. अर्थात ‘आधार’मुळे सर्वसामान्य नागरिकांची खासगी माहिती सार्वजनिक होत असल्याची भीतीदेखील व्यक्त होत होती. ती सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिलेल्या निकालाने सार्थ होती असेच सिद्ध केले आहे. आधार सक्ती करणारा हा निर्णय रद्द करण्यात आला. या निर्णयामुळे 122 कोटी जनतेला दिलासा मिळाला आहे. शिवाय आधारकार्ड हे घटनात्मकदृष्टय़ा वैध असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला. यापुढे बँक, मोबाईल किंवा शाळेसाठी आधार कार्डची गरज नाही असे ही स्पष्ट केले. त्यामुळे आधार कार्डचे अतिरेकी महत्त्व राहणार नाही. आधार कार्डने देशात बहुतेक कामात व्यवस्थितपणा आणला हे खरेच, पण शेवटी वैयक्तिक गोपनीयतादेखील तेवढीच महत्त्वाची आहे.



























































