गळफास घेतलेल्या तरुणाला देवदुताने मृत्यूच्या दारातून आणले माघारी…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमित खोत । मालवण

मालवण शहरातील मेढा भागात राहणाऱ्या साळुंखे कुटुंबातील भूषण भास्कर साळुंखे या 19 वर्षीय युवकाने घरातच गळफास लावल्याची घटना सोमवारी रात्री घडली. दोरीला लटकत असलेला भूषणला पाहून वडिलांनी टाहो फोडला. याच वेळी देवदूत बनून आलेल्या भालचंद्र उर्फ भूषण सुभाष परब या तरुणाने अत्यवस्थ पडलेल्या भूषण साळुंखे याची छाती पंम्पिंग करून तोंडावाटे श्वास दिला अन मृत्यूच्या दारातूनच भूषण मागे परतला.

मालवण मेढा येथील भूषण साळुंखे या तरुणाने घरगुती वादातून गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी भूषण याची आई कामानिमित्त बाहेर होती. तर वडील कामावरून घरी परतले होते. घराच्या लाकडी वाशाला गळफास स्थितीत लटकणाऱ्या आपल्या मुलाला पाहून वडिलांनी ओरड मारली. शेजारी राहणाऱ्यांनी साळुंखे कुटुंबियांच्या घरी धाव घेतली. याच वेळी भूषण परब, मंदार परब, उदय खराडे हे युवक परिसरात होते. दोरीला लटकत असलेल्या भूषण साळुंखे याला उदय खराडे, मंदार परब व भूषण परब यांनी दोरी कापून खाली काढले.

अत्यवस्थ पडलेल्या भूषण याला ग्रामीण रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकेला बोलावण्यात आले. भूषण याला वाचवण्यासाठी भूषण परब यांने त्यांना स्कुबा डायविंग प्रशिक्षण दरम्यान शिकवण्यात आलेल्या सीपीआर (कार्डिओपल्मनरी रेससिटेशन) अर्थात बेसिक लाईफ सपोर्ट याचा वापर केला. छाती पंम्पिंग करून तसेच तोंडावाटे श्वास देण्यास सुरुवात केली. दोन ते तीन मिनिटाच्या या क्रियेनंतर भूषण साळुंखे जणू मृत्यूच्या दाढेतून माघारी फिरावा तसा झटका देऊन उठला.

भूषण शुद्धीत आला मात्र त्याला श्वास घेण्यास तीव्र वेदना होत होत्या. तो हात पाय जोराने हलवत होता. त्या स्थितीत मंदार व भूषण याने त्याला मोटरसायकल वरून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. भूषणवर रुग्णालयात उपचार सुरू असताना नागरिक व त्याच्या मित्रपरिवाराने गर्दी केली. नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नगरसेवक गणेश कुशे, शिवसेना उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, नगरसेवक दीपक पाटकर, मोहन वराडकर या लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांनीही रुगणालायत धाव घेत नातेवाईकांना धीर दिला. उपचारानतंर त्याला जिल्हा रुग्णालयातून गोवा बांबुळीला हलवण्यात आले आहे.