मानधन वाढीसाठी अंशकालीन स्त्री परिचरीकांचे ११ ऑक्टोंबरला भीकमांगो आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । सिंधुदुर्गनगरी

मानधन वाढीसाठी जिल्ह्यातील अंशकालीन स्त्री परिचर कर्मचाऱ्यांनी आंदोलन करूनही त्याची शासनाकडून दखल घेतली जात नसल्याने ११ ऑक्टोंबरला अंशकालीन स्त्री परिचर कर्मचाऱ्यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा कडून शासकीय कार्यालयांमध्ये भीकमांगो आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे अतिरिक्त सचिव रावजी यादव यांनी दिली.

जिल्हा परिषद आरोग्य विभागांतर्गत अंशकालीन स्त्री परिचर कर्मचारी अत्यंत तटपुंज्या म्हणजेच दिवसाला ४० रूपये मानधनावर गेली अनेक वर्षे काम करत आहेत. मात्र वाढती महागाई लक्षात घेता या कर्मचाऱ्यांच्या मानधनात शासनाने वाढ केली नाही. शासनाच्या आरोग्यविषयक योजना डोंगराळ व दुर्गम भागातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करावी आणि प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यात आले होते. तसेच वेळोवेळी निवेदने देवूनही शासनाने कोणताच निर्णय न घेतल्याने १३ ऑगस्टला महाराष्ट्र राज्य कास्ट्राइब कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वाखाली अंशकालीन स्त्री परिचर कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. मात्र या आंदोलनाचीही दखल शासनाने घेतली नाही. त्यामुळे शासनाचे आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या नेतृत्वाखाली अंशकालीन स्त्री परिचर ११ ऑक्टोंबरला ओरोस श्री देव रवळनाथ मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढून सर्व शासकिय कार्यालयांसमोर भीकमांगो आंदोलन करणार आहेत. या आंदोलनातून जमा होणारा पैसा जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा केला जाणार असल्याचे सांगत या आंदोलनाचीही शासनाने दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

या आहेत प्रमुख मागण्या
जिप सेवेत पूर्वीप्रमाणे १० टक्के आरक्षण लागू करावे, महागाई लक्षात घेता किमान ७ हजार रूपये मानधन द्यावे, कंत्राटी कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व रजा लागू कराव्यात, अंगणवाडी आशांप्रमाणे १ हजार रुपये भाऊबिज मिळावी, गणवेषासह धुलाईभत्ता मिळावा, अंगणवाडी सेविका व मदतनीस भरतीमध्ये विनाअट सामावून घ्यावे, पूर्वीप्रमाणे मलेरिया, कुष्ठरोग, क्षयरोग, नारू आजारारांचे सर्वेक्षणाचे काम देवून त्याचा मोबदला द्यावा, किमान वेतन कायदा लागू करावा.