कोण कुणाला आडवं करतं ते बघू!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई 

पवारसाहेबांचे अन्य पक्षांत मित्र आहेत तसेच माझेही अन्य पक्षांत मित्र आहेत, असा अप्रत्यक्ष इशारा देणाऱया खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने खळबळ उडाली. आपल्या आधीच्याच विधानावर ठाम असल्याचे सांगत उदयनराजे यांनी आगामी निवडणुकीत कोण कुणाला आडवं करतं ते बघू. पण ज्यांना वाटतंय की उदयनराजेंशिवाय कुणीही चालतंय, उदयनराजेंपेक्षा जास्त मतांनी निवडून येईन तर त्याने आकडे दाखवावेत. मी त्याचा प्रचारक म्हणून काम करतो, असे आव्हानच उदयनराजे यांनी राष्ट्रवादी पक्षाला दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर उदयनराजे यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी मतदारसंघांतील कामांबाबत मुख्यमंत्र्यांना भेटल्याचे त्यांनी सांगितले.  ते पुढे म्हणाले, अनेक जण म्हणाले, उदयनराजे नको, कुणीही चालेल. अगदी मला आडवं करायचं चाललंय. पण कोण कुणाला आडवं करतंय ते येणाऱया निवडणुकीत बघू.लोकशाहीत इच्छाशक्ती आणि महत्त्वाकांक्षा असल्याशिवाय पुढे जाता येत नाही. राजे कुटुंबातले लोकांसाठी झटले म्हणून त्यांना लोकांनी डोक्यावर घेतले. लोकांनी जो विश्वास दाखवलाय तो अधिक महत्त्वाचा आहे. कुठल्याही पदापेक्षा त्याला मी अधिक महत्त्व देतो.

राजकीय चर्चा झाली, पण निर्णय योग्य वेळी!

मुख्यमंत्र्यांसोबत राजकीय चर्चा झाली का, या प्रश्नावर उदयनराजे यांनी सावध पवित्रा घेतला. राजकीय चर्चा झाल्याचे मान्य करतानाच भाजपमध्ये जाणार की नाही या प्रश्नाला त्यांनी बगल दिली. अजून या गोष्टीला उशीर आहे, त्यामुळे निर्णय योग्य वेळी घेऊ. आपलं पॉलिटिक्स हे इश्यू बेस पॉलिटिक्स आहे. जर पटलं नाही तर घरचा आहेर देणारच, असेही ते म्हणाले.

 माझी हौस भागली!

माझी हौस भागली. आमदारकी लढवली, खासदारकी लढवली. त्यामुळे आता लढवलीच पाहिजे, असे वाटत नाही. जर लोकांना वाटत असेल तरच निवडणूक लढवेन. जनता हाच माझा पक्ष आहे. मला एक व्यक्ती म्हणून जगण्याची इच्छा आहे, असे उदयनराजे म्हणाले.

बदलत्या काळानुसार बदलायला हवं

मराठा समाजाची आजची आर्थिक परिस्थिती बघा. त्या वेळच्या सत्ताधाऱयांनी दूरदृष्टीने निर्णय घ्यायला हवे होते. आरक्षणाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला हवं. बदलत्या काळानुसार बदलायला हवं. इकॉनॉमिकली बॅकवर्ड हाच क्रायटेरिया लावायला हवा. आर्थिक मागास मग तो कुठल्याही जातीचा असो. त्याला आरक्षण मिळायला हवे, असे उदयनराजे म्हणाले.

आरक्षणाबाबत मेरीट हाच क्रायटेरिया

मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असताना उदयनराजे यांनी आरक्षणाबाबत मेरीट हाच क्रायटेरिया भविष्यात राहील, असे विधान केले. आरक्षणाचा मुद्दाच आपल्याला अद्याप समजलेला नाही. पहिल्यांदा चार वर्ण पडले. त्याच्या 400 जाती तयार झाल्या. मुळात जात ही संकल्पनाच आपल्याला पटलेली नाही, असे ते म्हणाले. मंडल आयोगाच्या वेळी कसे लोक एकमेकांसमोर तलवारी घेऊन उभे राहिले होते. पण आर्थिक निकषावर आरक्षण लागू केलं असतं तर ही वेळच आली नसती.