
सामना ऑनलाईन । डोंबिवली
एमआयडीसी फेज एकमधील झेनिथ रबर प्रॉडक्टस् ही कंपनी आगीत जळून खाक झाली असून 300 कामगारांवर बेकारीचे संकट कोसळले आहे. सुदैवाने कोणतीही प्राणहानी झाली नसून कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले. रबर शिट्स बनवणाऱया या कंपनीच्या गोडाऊनमध्ये आधी आग लागली. ती एवढी भीषण होती की, गोडाऊनचे छत कोसळले. काही वेळेनंतर आगीची धग लगतच्या कंपनीला बसून त्यात संपूर्ण कंपनी भस्मसात झाली. डय़ुटीवर असलेले 90 कामगार प्रसंगावधान राखून बाहेर पळाल्याने ते बचावले. तब्बल 20 तास आगीचा भडका सुरू होता. दरम्यान आग नेमकी कशामुळे लागली हे समजले नसून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. डोंबिवली एमआयडीसीमध्ये आग तसेच स्फोटांच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याने औद्योगिक भाग धोक्याच्या उंबरठय़ावर आहे.
झेनिथ रबर ही सर्वात जुनी कंपनी असून त्यात एकूण 300 कामगार काम करतात. तीन शीफ्टमध्ये तिथे काम चालते. उच्च दर्जाचे रबर शिट्स बनवून त्याची परदेशात निर्यात होते. कंपनीच्या बाजूलाच मोठे गोडाऊन असून सोमवारी रात्री पाणेबाराच्या सुमारास गोडाऊनने पेट घेतला. सुरक्षारक्षकांमध्ये धावपळ उडाली. तातडीने वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला. मात्र आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले. आगीचे वृत्त समजताच कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ येथून तातडीने अग्निशमन दलाच्या गाडय़ा घटनास्थळी रवाना झाल्या. जवानांनी प्रयत्नांची शर्थ केली, पण आज दुपारपर्यंत आग आटोक्यात आली नाही.
…. तर कल्याण-शिळ रोडवरील सर्व कंपन्या बेचिराख झाल्या असत्या
झेनिथ कंपनीच्या शेजारीच सिग्मा सॉलवट केमिकल कंपनी आहे. आगीचा भडका उडाल्यानंतर झेनिथच्या कामगारांनी गोडाऊनमधील वीजपुरवठा तातडीने बंद केला. अन्यथा आग पसरून कल्याण-शिळ रोडवरील सर्व कंपन्या बेचिराख झाल्या असत्या, असे कामा संघटनेचे अध्यक्ष देवेन सोनी यांनी सांगितले. अग्निशमन दल व सुरक्षा दलाचे अधिकारी या भीषण आगीची चौकशी करीत आहेत. डोंबिवली औद्योगिक विभागात गेल्या वर्षी सहा तर या वर्षी आतापर्यंत पाच कंपन्यांना आग लागली आहे.
-सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष
झेनिथ कंपनीला लागलेली आग एवढी मोठी होती की, त्याच्या ज्वाळा दूरवरून दिसत होत्या. आगीचे वृत्त समजताच शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकात शिंदे, आमदार सुभाष भोईर, महापौर विनिता राणे, शिवसेनेचे नाशिक संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, सभागृहनेते श्रेयस समेळ आदींनी भेट दिली. डोंबिवलीच्या औद्योगिक भागातील कंपन्यांना आगी लावण्याचे प्रकार वाढले असून सुरक्षेचे सर्व नियम पाळले जातात का, याची चौकशी करण्याची मागणी आपण एमआयडीसी अधिकाऱयांकडे करणार असल्याचे सुभाष भोईर यांनी सांगितले.




























































