गोव्यात नवरात्रोत्सवासाठी मंदिरे सजली; मखरोत्सव ठरणार आकर्षण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, पणजी

फोंडा तालुक्यात होणाऱ्या नवरात्रोत्सवाला वेगळे महत्त्व आहे.  गोव्यातील बहुतेक प्राचीन मंदिरे या परिसरात वसली आहेत. या मंदिरामध्ये प्रत्येक रात्री होणारा मखरोत्सव हे नवरात्रोत्सवातील मुख्य आकर्षण मानले जाते. त्यामुळे पुढील आठ दिवस  भाविकांच्या गर्दीने येथील मंदिर परिसर फुलून जाणार आहे. शरद ऋतू आरंभ व घटस्थापनेने नवरात्रोत्सवाला प्रारंभ होणार असून पुढील आठ दिवस संपूर्ण माहोल नवरात्रोत्सवाच्या भक्तीरंगात न्हाऊन निघणार आहे.यंदा अष्टमी व नवमी एकाच दिवशी आल्याने नवरात्रोत्सव आठ दिवस चालणार आहे. नवरात्रोत्सव काळातील ललिता पंचमी व्रतोत्सव शुक्रवार 13 रोजी होणार आहे.

राज्यातील सर्व महत्वाची व मोठी संस्थाने फोंडा तालुक्यात वसली आहेत. कवळेची श्री शांतादुर्गा, बांदोड्याची आदिशक्ती श्री महालक्ष्मी, म्हार्दोळची श्री म्हालसा, बोरीची श्री नवदुर्गा, शिरोडय़ाची श्री कामाक्षी या शक्तीरुपी देवींच्या मंदिरांबरोबरच रामनाथी येथील श्री रामनाथ, नागेशीचा श्री नागेश महारुद्र, मंगेशीचा श्री मंगेश या मोठय़ा देवस्थानमध्येही नवरात्रोत्सवात मखरोत्सवाची जुनी परंपरा आहे. नवरात्रोत्सवाच्या प्रत्येक रात्री संबंधित देवदेवतांच्या विविध वाहनारुढ मूर्ती या मखरात सजवून त्यांची पूजा केली जाते. ग्रामदेव श्री कपिलेश्वर व इतर मंदिरातही मखरोत्सव साजरा केला जातो.

राज्यभरातील भाविक मखरातील देवीचे हे रुप पाहण्यासाठी आवर्जून उपस्थिती लावतात. माशेलचे श्री देवकीकृष्ण संस्थान व पंचक्रोशीतील इतर मंदिरांचा परिसरही पुढील आठ दिवस नवरात्रांच्या नवरंगात रंगून जाणार आहे. तालुक्यातील या मुख्य मंदिरांबरोबरच विविध गावांमध्येही नवरात्रोत्सव उत्साहात साजरा होणार आहे. या छोटय़ा मंदिरांमध्ये मखराची परंपरा नसली तरी देवीच्या मूर्तीला फुले व अलंकारानी आकर्षक सजविले जाते.कवळे येथील शांतादुर्गा आणि बांदोड्यातील श्री महालक्ष्मी मंदिरात मखरात सजवण्यात येणारी देवीची विविध रुपे, म्हार्दोळ येथील महालसा नारायणी मंदिरात मखरातील पाच देवी, नागेशी येथील भस्म ही नवरात्रोत्सवातील काही मुख्य वैशिष्टय़े मानली जातात.

मंदिरातील मखरोत्सव व इतर सांस्कृतिक उत्सवांबरोबरच तालुक्यात  ठिकठिकाणी गरबा दांडियांचे कार्यक्रम रंगणार आहेत. गुजराती समाजाबरोबरच हल्ली स्थानिक तरुण मंडळीमध्ये दांडियाचे आकर्षण वाढले आहे. फोंड्यात स्थायिक झालेल्या गुजराती समाजातर्फे खेळला जाणारा पारंपरिक गरबा दांडिया हे  नवरात्रोत्सवातील आणखी एक आकर्षण असेल. याशिवाय गावागावातील प्रत्येक शाळा, सांस्कृतिक क्लब व संस्थांतर्फे शारदोत्सवानिमित्त विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. आजपासून पुढील नऊ दिवस भक्तीमय वातावरणात देवीचा जागर चालणार आहे.