
सामना ऑनलाईन, संभाजीनगर
रेल्वे स्टेशनजवळील आऊटर सिग्नलचे वायर तोडून सिग्नल बंद करून उघडय़ा खिडकीत बसलेल्या महिला प्रवाशांच्या गळय़ातील सोन्याचे दागिने लंपास करणारी टोळी लोहमार्ग पोलिसांनी गजाआड केली. या टोळीच्या ताब्यातून दोन कार, दुचाकी आणि सोन्याचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
कल्याण परिसरातील ठाकुर्ली येथे राहणारा रोहित राळेभात रेल्वेच्या ठेकेदाराकडे कंत्राटी कामगार म्हणून काम करीत होता. त्याला सिग्नलची जोडणी कशी केली जाते, कोणते वायर तोडले तर सिग्नल मिळत नाही याची जाण होती. याचा फायदा घेऊन रोहितच्या साथीदारांनी टोळी तयार केली. स्टेशनजवळ अंधारात आऊटर सिग्नलचे वायर कट केली की रेल्वेला सिग्नल मिळत नाही. सिग्नल लाल असल्यामुळे चालक रेल्वे त्या ठिकाणी थांबवून सिग्नल मिळविण्यासाठी हॉर्न वाजवीत. ही संधी साधून चोरटे खिडकीत बसलेल्या प्रवाशांच्या गळय़ातील सोन्याचा ऐवज घेऊन अंधारात पोबारा करत.
रेल्वे थांबवून लुटण्याच्या घटना काही दिवसांपासून वाढल्यामुळे लोहमार्ग पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी तातडीने गस्त वाढविण्याचे आदेश दिले. पोलीस उपअधीक्षक संजय सातव, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, दिलीप साबळे, पोलीस उपनिरीक्षक आनंद बनसोडे यांच्या पथकास नगर जिह्यातील जामखेड रेल्वे लुटणाऱया टोळीतील गुन्हेगार राहत असल्याची माहिती मिळाली. साबळे यांच्या पथकाने सापळा रचून बाबू कसबे यास ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी करण्यात आली असता त्याने विनोद जाधव, सुधीर रंदील आणि रोहित राळभाते या चौघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी नाशिक, मनमाड, नांदेड, सातारा, निफाड, जळगाव, परभणी, कुर्डवाडी यासह अंध्र प्रदेशातील अनेक रेल्वेंवर दरोडे घातल्याची कबुली दिल्याचे साबळे यांनी सांगितले.
कार, दुचाकीचा वापर
रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावर असलेल्या आऊट सिग्नलपासून जवळच अंधारात कार आणि दुचाकी घेऊन हे चोरटे जात. रेल्वेत लूटमार केल्यावर ते दुचाकी आणि कारने परत जात होते. अंधाराचा फायदा घेऊन ते चोरटे वाहनातून निघून जात होते. त्या चोरटय़ांच्या ताब्यातून दोन कार, एक दुचाकी, 62 ग्रॅम सोने असा 9 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला असल्याचे पोलीस उपनिरीक्षक आनंद बनसोड यांनी सांगितले.




























































