
सामना ऑनलाईन । मुंबई
भाजपच्या एकूण लोकप्रतिनिधींपैकी 40% आमदार आणि 27% खासदारांची कामगिरी खराब असल्याचे त्यांच्या ‘रिपोर्ट कार्ड’मध्ये स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातल्या भाजप आमदार आणि खासदार यांच्या चार वर्षातील कामकाजाचा एक गोपनीय अहवाल लोकप्रतिनिधींच्या हाती दिला असून आपली कामगिरी सुधारण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच वेळीच सुधारणा न केल्यास पुढील निवडणुकीत तिकिट मिळणार नाही अशी तंबीही दिली आहे.
‘द टाइम्स ऑफ इंडिया’ या वृत्तपत्राने यासंदर्भात एक वृत्त प्रसिद्ध केलं आहे. भाजपने ‘चाणक्य’ या संस्थेकडून भाजप लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघात सर्वेक्षण घेतले होते. त्यात मतदारांना विविध प्रश्न विचारण्यात आले होते. महत्वाचे म्हणजे ‘तुम्ही आपल्या लोकप्रतिनिधींच्या कामाने समाधानी आहात का? आणि याच व्यक्तीला पुढील निवडणुकीत तुम्ही निवडून देणार का?’ असे दोन प्रश्न मतदारांना विचारण्यात आले. त्यात भाजपचे 40% आमदार म्हणजेच 45 आमदार व 27% खासदार अर्थात 6 खासदारांवर मतदारराजा नाराज आहे, असं समोर आलं आहे. या लोकप्रतिनिधींना पुन्हा तिकीट दिल्यास ते पराभूत होण्याची शक्यता अधिक असल्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे, अशी माहिती या वृत्तात देण्यात आली आहे. ‘‘हे लोकप्रतिनिधी डेंजर झोनमध्ये आहेत, मतदारांना गृहीत धरून नका. वेळीच सुधारणा करा अन्यथा पुढच्या निवडणुकीत यांना तिकीट मिळणार नाही” असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजपच्या लोकप्रतिनिधींच्या बैठकीवेळी दिले. दादरच्या भाजप कार्यलयात ही बैठक पार पडली तेव्हा लोकप्रतिनिधींच्या हातात हा गोपनीय अहवाल ठेवण्यात आला. तसेच त्यांनी अहवाल पक्ष कार्यालयात न उघडता, घरी जाऊन त्यावर विचार करावा, असंही सांगण्यात आलं होतं.
बैठकीला खासदारांच्या दांड्या
भाजपच्या लोकप्रतिनिधींसाठी ही विशेष बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी 85 टक्के आमदारांनी हजेरी लावली, पण बहुतांश खासदारांनी दांडी मारली. गंभीरबाब म्हणजे मुंबई भाजपचे तीन खासदार आहेत, त्यापैकी फक्त उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी उपस्थित होते. किरीट सोमय्या आणि पूनम महाजन यांनी या बैठकीला अनुपस्थिती दर्शवली.

































































