पीएचडी सोडून दहशतवादी बनलेल्या मन्नान वाणीचा चकमकीत खात्मा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू-कश्मीरमधील हंदवाडा येथे दहशतवादी-सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये ‘हिजबुल मुजाहिद्दीन’ या दहशतवादी संघटनेचा कमांडर मन्नान बशीर वाणी याचादेखील समावेश आहे. मन्नान हा अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील (एएमयू) पीएचडीचा विद्यार्थी होता. पीएचडी सोडून तो दहशतवादी संघटनेत सामील झाला होता.

हंदवाडामधील शाहगुंड या गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. सकाळी सुरक्षा दलांनी परिसरात शोधमोहीम राबवली असता चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. घटनास्थळावरून मोठय़ा प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. मृत्यू झालेल्या दहशतवाद्यांमध्ये ‘हिजबुल मुजाहिद्दीन’ या दहशतवादी संघटनेचा कमांडर मन्नान बशीर वाणी याचा समावेश आहे. वाणी (27) आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी शरण येण्याचे आवाहन केले, मात्र त्यांनी गोळीबार केला आणि यानंतर झालेल्या चकमकीत दोघांचाही खात्मा करण्यात आला. दरम्यान, ही चकमक ताजी असतानाच शोपियाँ जिह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला. हल्ल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे.

कश्मीरात रोज एक उच्चशिक्षित युवक मरतोय – मेहबुबा मुफ्ती
वानीच्या मृत्यूनंतर पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी दुःख व्यक्त केले. त्या म्हणाल्या, ‘पीएचडीचा विद्यार्थी असलेल्या वाणीचा मृत्यू झाल्याने शेवटी आपलेच नुकसान झाले आहे. सुशिक्षित तरुणांनी दहशतवादी संघटनेत सामील होऊन दहशतवादी मार्ग स्वीकारणे दुर्दैवी आहे. कश्मीर खोऱयात सुरक्षा दलांशी चकमकीत रोज एक उच्चशिक्षित युवक मरतोय. सर्व राजकीय पक्षांनी याचे गांभीर्य ओळखण्याची गरज आहे. शांततेसाठी पाकिस्तान व अन्य घटकांशी चर्चा झालीच पाहिजे’, अशी मागणी त्यांनी केली.