झाडांची कत्तल करताना लोकांचेही जरा ऐका! हायकोर्टाने केली मेट्रोची ‘कान’उघाडणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

आरेतील झाडे तोडण्यासंदर्भात घेण्यात येणाऱ्या जनसुनावणीत वृक्ष प्राधिकरणाकडून नागरिकांचे म्हणणे विचारात घेतले जात नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने मेट्रोसह आज पालिकेला फैलावर घेतले. पर्यावरणाचे हित लक्षात घेता झाडांच्या कत्तलींना आक्षेप घेणाऱ्या नागरिकांची निष्पक्ष बाजू ऐकून घ्या आणि यावर योग्य तो न्यायनिवाडा करा, असे आदेश देत हायकोर्टाने याबाबतची याचिका निकाली काढली.

आरे कारशेडसाठी वृक्ष प्राधिकरण समितीने झाडे तोडण्याची परवानगी दिलेली नसतानाही 33 हेक्टर जागेसाठी 2700 झाडांची मेट्रो प्रशासनाकडून कत्तल केली जाणार आहे. वृक्ष प्राधिकरणाने याविषयी नागरिकांच्या सूचना आणि तक्रारी मागविल्या आहेत. असे असतानाही मेट्रोने या तक्रारी आणि सूचना विचारात न घेताच कारशेडकरिता शेकडो झाडे तोडण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे या वृक्षतोडीविरोधात स्थानिकांसह अनेक पर्यावरणवादी संस्थांनी आक्षेप घेतला असून ‘आप’च्या प्रीती शर्मा आणि रुबेन मस्कारेनहास यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. मेट्रोने झाडे तोडण्याचे काम थांबवावे, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेवर प्रभारी मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी सुनावणी घेण्यात आली. त्या वेळी हायकोर्टाने पालिकेला झाडे तोडण्याच्या परवानगीबाबतची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले.

एमएमआरसीएलकडून प्रतिज्ञापत्र
एका दिवसात प्रतिज्ञापत्र सादर केले नाही तर आरे कॉलनीतील एकही झाड कापू देणार नाही, अशी तंबीही मेट्रो प्रशासनाला दिल्यानंतर मेट्रो प्रशासनाने परवानगीशिवाय एकही झाड तोडणार नाही असे प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर केले. वृक्षतोडीची भरपाई म्हणून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 22 हजार नवीन झाडे लावण्यात आली आहेत. पुनर्रोपित होणारी झाडे तोडली जाणार नाहीत, अशी माहिती या वेळी कोर्टाला देण्यात आली.

वृक्षतोडीविरोधात पालिकेकडे 40 हजार तक्रारी

आरे कॉलनीतील वृक्षतोडीसंदर्भात घेण्यात येत असलेल्या जनसुनावणीत पालिकेकडे आतापर्यंत 40 हजार लेखी तक्रारी आल्या आहेत. शिवाय 200 रहिवाशी या जनसुनावणीला हजर होते. मात्र या नागरिकांच्या तक्रारींचे निवारण न करताच जनसुनावणीतून मेट्रोच्या अधिकाऱ्यानी काढता पाय घेतल्याचे याचिकाकर्त्यांनी कोर्टाला सांगितले.