
सामना प्रतिनिधी । पुणे
विमानतळ रस्त्यावरील ५०९ चौक येथे पूरू सोसायटीलगत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू असून, तेथील झाडे विनापरवाना तोडताना विचारणा करणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेविका श्वेता चव्हाण यांच्या पतीला संबंधित ठेकेदाराने जेसीबी अंगावर घालण्याचा प्रयत्न करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे याप्रकरणी संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी महापौर मुक्ता टिळक आणि आयुक्त सौरभ राव यांच्याकडे करण्यात आली आहे.
जलवाहिनीच्या कामासाठी रस्त्यावरील झाडे मुळासकट तोडण्याचा प्रकार चालू असल्याचे शिवसेनेचे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक श्रीशेठ चव्हाण यांच्या लक्षात आले. त्यांनी संबंधित कामगार आणि ठेकेदारास वर्क ऑर्डरबाबत विचारणा केली. त्यावर ठेकेदाराने दमदाटी केली. श्रीशेठ चव्हाण, पालिकेचे कनिष्ठ अभियंता राजेश विचे, निर्मल मंत्री यांच्या अंंगावर जेसीबी घालण्याचा प्रयत्न केला. सर्व अधिकारी वर्गाला त्यांचा हिस्सा दिला असल्याचे अधिकाऱ्यांना लक्ष्मी नारायण एन्टरप्रायजेसचे अनुप आणि राजेश अगरवाल यांनी सांगितले. त्यामुळे संबंधितांवर कारवाईची मागणी चव्हाण यांनी केली आहे.




























































