संघाची मोदी सरकारवर कडाडून टीका, पुन्हा करून दिली ‘राजधर्मा’ची आठवण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

‘वर्तमानात राजा कोण हे आपण सर्वजण जाणता. राजाचे काम आहे त्याने प्रजेला सुखी ठेवावं. सुरक्षा द्यावी. पण निवडून आलेल्यांमध्येही तसा सेवाभाव कुठं दिसतोय?’, असा खणखणीत सवाल करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर सहकार्यवाह भय्याजी जोशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचं नाव न घेता टीका केली आहे. येत्या लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर त्यांचं हे विधान महत्वाचं मानलं जात आहे.

‘भारत विकास परिषदे’च्या मुंबई विभागाने गुरुवारी सायंकाळी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ‘राष्ट्र निर्माणात समृद्ध वर्गाची रचनात्मक भूमिका’ या विषयावर भय्याजी जोशी बोलत होते. त्यांच्या भाषणात त्यांनी सध्याच्या स्थितीवर अत्यंत परखड मत मांडली आणि प्रश्नही उपस्थित केले.

यावेळी भय्याजी जोशी म्हणाले ‘राजाचे काम आहे त्याने प्रजेला सुखी ठेवावं. सुरक्षा द्यावी. मतभेद-संघर्ष होतील त्यासाठी न्यायव्यवस्था उभी करावी. शेजाऱ्यांशी (शेजारी राष्ट्र) यांच्याशी कसे संबंध ठेवावेत याची नीती ठरवावी. वर्तमानात राजा कोण हे आपण सर्वजण जाणता. लोकतंत्रात सत्तेचे प्रमुख त्यालाच राजा मानतात. ही आतापर्यंतची शाश्वत गोष्ट. कधीही सत्तेद्वारे समाजात परिवर्तन येत नाही. तर ते सामाजिक व्यवस्थेने येते. हजारो वर्षांपूर्वीपासून राजाने सामाजिक व्यवस्थेत हस्तक्षेप केला नाही. सामाजिक व्यवस्थेने राजाच्या कामात हस्तक्षेप केला नाही. परस्पर विश्वासाच्या आधारावर हे जीवन इतकी वर्षे चालत आलं आहे. पण राजाही तेव्हाच ठीक असतो जेव्हा समाज जागृत असतो. लोकतंत्रात याची निश्चित गरज आहे. आज राजेशाही संपुष्टात आलीय. दुनियेत ती कुठे दिसत नाही, ना राजा दिसतो. कुणीतरी असं मस्करीत म्हटलं की आता फक्त चार राजे शिल्लक आहेत, तेही पत्त्यात आणि पाचवा इंग्लंडमध्ये आहे.’, असं जोशी म्हणाले.

जेव्हा धर्माचं प्रकरण न्यायालयात जातं वेदना होतात!

‘आजचं दृश्य वेदनादायी. धर्माच्या क्षेत्रात कधीकधी विकृती दिसते. पण सर्व धर्मक्षेत्र बिघडली असा त्याचा अर्थ नाही. धर्मक्षेत्रात साधू, संत, संन्यासी यांचे मार्गदर्शन करण्याचे काम. कथाकार प्रवचनकार, ग्रंथाद्वारे मार्गदर्शन करणारे आपली शक्ती बनायला हवी. जेव्हा धर्माचं प्रकरण न्यायालयात जातं वेदना होतात. न्यायाधीश या प्रकरणाचा न्यायनिवाडा करतो. ज्यांनी न्याय करायचाय त्यांनीच न्याय मागायला जावं यापेक्षा मोठी विडंबना ती कोणती?, असा खणखणीत सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

निवडून आलेल्यांमध्येही तसा सेवाभाव कुठं दिसतोय?

‘लोकशाहीत राजनेता सर्वेसर्वा बनलाय. किमान तसं मानलं जातं आहे. राजकारणी तर तसं मानतात. पण, आपणही तसं समजून चाललो आहोत हाच चिंतेचा विषय आहे. समाजतल्या सर्व शक्तीकेंद्रानी राजकारण्यांना प्रभावित केलं पाहिजे, न की राजकारण्यांनी इतरांना. लोकशाहीत सर्व अधिकार प्राप्त होतात. त्यातून सत्तेचा दर्प जन्मतो. निवडणुकी आधी सेवा करण्याचे आश्वासन देत मत मागणारा पराभवानंतर कुठे गायब होतो? अर्थात, निवडून आलेल्यांमध्येही तसा सेवाभाव कुठं दिसतोय? समाजाप्रती उत्तरदायित्व केवळ सत्ता प्राप्त करण्यासाठीच आहे का? आजही उत्तम शासकांची आठवण राजा हरिश्चंद्र, राजा विक्रमादित्य, राजा शालीवाहन यांच्या नावांनीच का होते? कारण, या राजांनी त्यांच्यातल्या सामर्थ्याचा उपयोग समाजाच्या भल्यासाठी केला. देशातील वैज्ञानिक गौरवास पात्र ठरतात. होमी भाभा, विक्रम साराभाई, अब्दुल कलाम यांचे आजही स्मरण होते. ते का? कारण, त्यांनी सर्व शक्ती देशासाठी समर्पित केली. हे सगळं घडू शकलं. कारण, राजकारण्यांचा हस्तक्षेप कमी होता.’ असंही ते म्हणाले.

summary: rss slams pm modi and bjp govt