
सामना प्रतिनिधी । नांदेड
नांदेड नगरपालिकेत कर अधीक्षक पदावरून सेवानिवृत्त झालेल्या सायन्ना गंगाराम बत्तीन व त्यांच्या पत्नीस न्यायालयाने बेकायदेशीर संपत्ती जमावल्याप्रकरणी शिक्षा सुनावली आहे.
२४ फेब्रुवारी १९९३ रोजी गवळीपूरा सायन्ना गंगाराम बत्तीन यांच्या घराशेजारी राहणार्या अखिल खान नावाच्या व्यक्तीने लाच लुचपत प्रतिबंधक विभाग संभाजीनगरकडे सायन्ना बत्तीनने आपल्या सेवा काळात भरपूर बेकायदेशीर संपत्ती जमवल्याचा अर्ज पाठवला होता. यावर संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नांदेड युनिटकडे तो अर्ज पाठवून त्याची गुप्त चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार तत्कालीन पोलीस निरीक्षक गोपीनाथ पाटील यांनी गुप्त चौकशी पुर्ण करून उघड चौकशी करण्याची गरज असल्याचा अहवाल पाठवला आणि ती परवानगी मिळाली. त्यानुसार सायन्ना गंगाराम बत्तीन यांच्या बेकायदेशीर संपत्तीची उघड चौकशी सुरू झाली.
सायन्ना बत्तीन हे मुळ नवीपेठ ता. जि. निजामबाद येथील रहिवासी आहेत. चौकशी झाली तेव्हा सायन्ना गंगाराम बत्तीन आणि त्यांची पत्नी आणि ६ अपत्याच्या नावावरच्या संपत्तीची चौकशी झाली तेव्हा ६ लाख ९१ हजार ६४६ रूपये ४ पैसे एवढी बेकायदीशीर संपत्त्ती आढळली. त्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक शंकरराव संगू यांनी अशी अपसंपदा असल्याची तक्रार दिली आणि वजिराबाद पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार सायन्ना गंगाराम बत्तीन आणि त्यांची पत्नी विठाबाई सायन्ना बत्तीन यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तत्कालीन पोलिस उपअधीक्षक माणिक पेरके यांनी सन २००१ मध्ये बत्तीन पती-पत्नीविरूद्ध न्यायालयात ३१४ साक्षीदारांच्या यादीसह दाखल केलेल्या दोषारोप पत्रात बत्तीन पती-पत्नीच्या नावावर एकूण १९ लाख ४६ हजार ७३६ रूपये १५ पैसे एवढी अपसंपदा असल्याचे लिहिलेले होते. यानंतर सन २०१६ पर्यंत बत्तीन पती-पत्नीने आपल्याकडे असलेली संपत्ती कशी खरी आहे हे दाखवण्याचे अनेक कागदपत्र न्यायालयात दाखल केले. न्यायालयाच्या प्रक्रियेत सरकार पक्षाच्या वतीने २१ साक्षीदार तपासण्यात आले आणि सायन्ना बत्तीन यांच्यावतीने सुद्धा पाच बचावाचे साक्षीदार तपासण्यात आले, अशी माहिती सहायक सरकारी वकील अॅड. रणजित देशमुख यांनी दिली.
१२ ऑक्टोबर रोजी जिल्हा न्यायाधीश हरीभाऊ वाघमारे यांनी सायन्ना गंगाराम गौड (बत्तीन) आणि त्यांची पत्नी विठाबाई सायन्ना गौड (बत्तीन) या दोघांना बेकायदेशीर संपत्ती जमवल्याप्रकरणी दोषी जाहीर केले. यात सायन्ना गंगाराम गौड (बत्तीन) यांना ४ वर्षे सक्तमजुरी १८ लाख रूपये दंड आणि दंड न भरल्यास जास्तीची सक्तीमजुरी अशी शिक्षा ठोठावली. विठाबाई सायन्ना गौड (बत्तीन) यांना एक वर्षे साधी कैद आणि २५ हजार रूपये रोख दंड ठोठावण्यात आला. गवळीपूरा येथील त्यांचे घर सरकारच्या संपत्तीत जमा करण्याचे आदेश न्या. हरीभाऊ वाघमारे यांनी दिली असल्याची माहिती अॅड. रणजित देशमुख यांनी दिली.

























































