
सामना ऑनलाईन,मुंबई
जागतिक अंडी दिनानिमित्त शुक्रवारी शालेय विद्यार्थ्यांना पोषणमूल्य असलेली अंडी देण्याच्या आदेशाचा बोजवारा उडाला आहे. शाळांमध्ये अंडी दिन साजरा करण्याच्या सूचना उशिरा पोहोचल्याने विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरविणाऱ्या महिला बचत गटांनी अंडी पुरवलीच नाहीत. बहुसंख्य अल्पसंख्याक शाळा शाकाहारी आहेत. त्यातच नवरात्रोत्सवही सुरू असल्याने शाळांमध्ये ‘अंडी दिन’ साजरा झालाच नाही.
‘अंडी दिना’च्या निमित्ताने शाळा तसेच रुग्णालयांत 30 लाख अंडय़ांचे वाटप करण्याचे उद्दिष्ट पशुसंवर्धन विभाग आणि शिक्षण विभागाने निश्चित केले होते. त्यानुसार शिक्षण विभागाने शाळांमध्ये ‘अंडी दिन’ साजरा करण्याचे निर्देश दिले होते. यादरम्यान अंडय़ाचे आहारातील महत्त्व सांगण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या, मात्र मुंबईतील शाळांनी पोषण आहार पुरविणाऱ्या महिला बचत गटांना याबाबत सूचनाच दिल्या नाहीत. शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांनी तोंडी आदेश देऊन शक्य तेवढय़ा विद्यार्थ्यांना अंडी वाटप केले. त्यानुसार मुंबईत किरकोळ शाळांमधील एखाद दुसऱ्या वर्गाला अंडी देण्यात आली, परंतु इतर शाळांमध्ये नियोजनाअभावी हा दिन साजरा झाला नाही. अशीच काहीशी परिस्थिती राज्यातील शाळांमध्ये घडली.
शिक्षण विभागाने निदान महिनाभर आधी हा दिन साजरा करण्याचे आदेश दिले असते तर शाळांनी याबाबत तयारी केली असती. पोषण आहार पुरविणाऱ्या संस्थांनीही त्या दृष्टीने तयारी केली असती, मात्र पशुसंवर्धन विभाग आणि शिक्षण विभागामध्ये समन्वय नसल्याने हा गोंधळ उडल्याचे मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेडीज यांनी सांगितले. नवरात्रोत्सव सुरू असल्याने बहुसंख्य घरात शाकाहार घेतला जात असल्यामुळे काही विद्यार्थ्यांनीच अंडी खाण्यास नकार दिला. हंसराज मोरारजी शाळेतील शिक्षक उदय नरे यांनी सांगितले की, आमची शाळा शाकाहारी असल्याने अंडी वाटप झाले नाही.


























































