लाच प्रकरणी पोलीस हवालदारावर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। हिंगोली 

तालुक्यातील कनेरगाव नाका येथील पोलीस चौकीचे पोलीस हवालदार कानबाराव थिटे यांच्यावर दोन हजाराची लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ड्राय डे च्या दिवशी अवैधरित्या दारू विक्री करू देण्यासाठी थिटे यांनी एकाकडे दोन हजार रुपयाची लाच मागितली होती.

कनेरगाव नाका येथे राहणाऱ्या एका पान टपरीधारकाने थिटे यांच्याकडे ड्राय डे च्या दिवशी अवैधरित्या दारू विक्री करू द्यावी असे सांगितले होते. त्यावर थिटे यांनी त्याच्याकडून तीन हजार रुपयाची लाच मागितली. त्यानंतर टपरीधारकाने हिंगोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबदद्ल तक्रार दाखल केली. त्यानंतर टपरीधारकाने थिटे यांच्याबरोबर तडजोड करत तीन ऐवजी दोन हजार रुपये देतो असे सांगितले. त्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा लाचलुचपत विभागाने सापळा रचला . मात्र थिटे यांना संशय आल्याने त्यांनी एसीबी च्या पथकाला गुंगारा देत पळ काढला. दरम्यान,याप्रकरणी थिटे याच्यावर लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.