
सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा
जेएनपीटीच्या चौथ्या बंदरात बीएमसीटी मध्ये शनिवार 13 रोजी एक महाकाय जहाज बंदरातील बर्थला धडकले. जहाजाला थांबण्यासाठी नांगर टाकण्यात आला होता मात्र तरीही हे जहाज थांबले नाही. सुदैवाने जहाजाचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली अन्यथा मोठी जीवित व वित्त हानी झाली असती. या जहाजामध्ये हजारो कंटेनर भरलेले होते.
शनिवारी दुपारी जेएनपीटीतील चौथे बंदर अर्थात सिंगापूर पोर्ट एथोरीटीचे बीएमसीटी या बंदरात हा अपघात झाला. जेएनपीटी बंदरात नेहमी महाकाय जहाज येत असतात. जेएनपीटी बंदराच्या बाजूला ही जहाजे थांबल्यानंतर छोट्या बोटीं(ठग)मार्फत ही जहाजे खेचत आणून बंदराच्या जेट्टीला लावली जातात आणि त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने जहाजामध्ये कंटेनर चढविण्याचे व उतरविण्याचे काम केले जाते. शनिवारी असेच सीजीएम कंपनीचे एक महाकाय जहाज चौथ्या बंदरात कंटेनर मालाची चढ उतार करण्यासाठी आले होते. मात्र जहाजाच्या कॅप्टनला जहाज वेळीच थांबवता आले नाही त्यामुळे हे जहाज बीएमसीटीच्या बर्थला धडकले. जहाजाचा वेग कमी असल्याने मोठी हानी झाली नसली तरी बर्थचे नुकसान झाले आहे.
या बाबत बीएमसीटीचे एचआर मॅनेजर अवधुत सावंत यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला मात्र ज्यांच्या समोर हा प्रकार घडला त्या अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर जहाजाच्या कॅप्टनच्या चुकीमुळे हा प्रकार घडला असल्याचे सांगितले. या अपघाताची चौकशी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तर कामगारांच्या मते ऑपरेशनच्या चुकीमुळे हा प्रकार घडला असल्याचे सांगितले.





























































