
सामना ऑनलाईन, पाटणा
हा देश, जग, निसर्ग सर्वांचाच आहे. प्रत्येकाला देशात कुठेही जाण्याचा अधिकार आहे. जर कुणाला वाटत असेल की ते सर्वाधिक शक्तिशाली आहेत तर त्यांनी एक लक्षात घ्यावे त्यांची ही ताकद जास्त दिवस टिकणार नाही, अशा शब्दांत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी गुजरातमध्ये होत असलेल्या बिहारींवरील हल्ल्यांप्रकरणी सरकारवर निशाणा साधला आहे.
समाजात संघर्षमय परिस्थिती निर्माण झाली असून सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजात हिंसा पसरवण्यात येत आहे. समाजात प्रेम आणि सुखसमृद्धीचे वातावरण तयार व्हायला हवे, असेही नितीशकुमार यांनी म्हटले आहे. दरम्यान, गुजरातमध्ये बिहारींवर होत असलेल्या हल्ल्यांप्रकरणी तेजस्वी यादव यांनी नितीशकुमार यांना जोरदार टोला लगावला आहे. देशभरात विविध राज्यांमध्ये बिहारी लोकांवर हल्ले होत आहेत. हे हल्ले थांबवण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री काय करत आहेत? गुजरात असो किंवा बिहारी आपण हिंदुस्थानी आहोत. आपणा सर्वांनाच पोट भरण्यासाठी देशभरात कुठेही जाण्याचा अधिकार असल्याचे तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे.
काय आहे प्रकरण
गुजरातमधील अहमदाबादमध्ये 14 महिन्यांच्या मुलीवर बलात्कार झाल्यानंतर येथील उत्तर हिंदुस्थानींवर हल्ले होत आहेत. त्यामुळे बिहारींमध्ये दहशतीचे वातावरण असून गुजरातमधील 50 हजारांहून अधिक उत्तर हिंदुस्थानींनी पळ काढला आहे. रोजगार गमावल्यामुळे गुजरातमधून बिहारला परतलेल्या मजुरांच्या कुटुंबांची उपासमार होत आहे. गुजरातमध्ये बिहारींवर होत असलेल्या हल्ल्यांना इतके दिवस झाल्यानंतर आणि गुजरातमधून मजुरांना हाकलल्यानंतरही बिहार सरकार राजनैतिक टिपण्णी करण्याव्यतिरिक्त काहीच करत नसल्याचे उघड झाले आहे.




























































