
सामना प्रतिनिधी । हलगरा
निलंगा तालुक्यातील मौजे हलगरा येथील नवरात्रोत्सव जिल्ह्यातील आगळा वेगळा नवरात्रोत्सव म्हणून ओळखला जात आहे. दररोज या ठिकाणी वेगवेगळे देखावे सादर केले जात आहेत. देखावे पाहण्यासाठी ग्रामस्थ माठ्या संख्येने उपस्थिती दर्शवतात.
१९९० मध्ये हलगरा येथील नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला. या मंदिराची उभारणीच विश्वस्त मंडळाच्या श्रमदानातून झालेली आहे. या मंदिराच्या कामासाठी विश्वस्त मंडळ, सेवा मंडळाचे सदस्य असणारे व्यंकटराव सगरे, ज्ञानेश्वर जाधव, शिवाजी शेळके, तानाजी शेळके, शेषराव गायकवाड, सुरेश गायकवाड, पंडित जाधव, अंगद मुसळे, मंदिराचे पुजारी गोपाळ गरुड, तुकाराम गरुड, राजीव गिरी यांच्यासह आई जगदंबेच्या सेवकांच्या श्रमदानातून, ग्रामस्थांच्या सहकार्यातून हा नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत असतो.

राज्यात गणेशोत्सवामधील विविध देखावे प्रसिध्द आहेत. परंतु लातूर जिल्ह्यात हलगरा येथील नवरात्रोस्तव विविध सामाजिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक, कौटूंबिक देखाव्यांसाठी जिल्ह्यात प्रसिध्द होत आहे. दररोजच्या आरतीसाठी सुमारे एक हजार महिला, पुरुष, मुले, मुलींची उपस्थिती असते. यावर्षी सर्व धर्म समभाव दर्शवणारा देखावा सादर करण्यात आला. त्यानंतर कुंभकर्ण झोपेतून उठवण्याचा देखावा सादर करण्यात आला, आतंकवादी हल्ला परतवून लावणारे सैनिक, छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील देखावा सादर करण्यात आला तर आज झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यावरील देखावा सादर करण्यात येणार आहे तर शेवटच्या दिवशी रावण दहणाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात येतो.





























































