
ME TOO पेक्षा स्वसंरक्षण करा!!
सगळी समाजमाध्यमं सध्या ‘Me Too’ या एकाच मोहिमेने व्यापली आहेत. मी टू… मीसुद्धा… माझ्यावरही अत्याचार झाला आहे… आज बऱ्याजचणी अनेक वर्षांपूर्वी झालेल्या अत्याचाराविरुद्ध तोंड उघडत आहेत. अत्याचार झालाच आहे… अत्याचार करणाऱ्याला शासनही व्हायलाच हवे… पण आपल्यापैकी प्रत्येकीने यावर विचार करायला हवा… की अत्याचार त्यावेळेस निदर्शनास आणला तर त्याला शासन होणे किंवा करणे सोपे जाते. याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अत्याचाराला प्रतिकार करणे… स्वसंरक्षण करणे… प्रत्येक स्त्रीने ते करायलाच हवे… जेव्हा खऱ्या अर्थाने स्त्री कणखर होईल तेव्हा अशा मोहिमांची गरज भासणार नाही.
‘मी टू’ मोहिमेमुळे सध्या अनेक सेलिब्रेटीजचे खरे चेहरे समोर आले आहेत. आजही स्त्रियांवर अत्याचार होतो. कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण केले जाते. पण कामाच्या ठिकाणी महिलांवर होणारा लैगिंक अत्याचार रोखण्यासाठी 2013 साली कायदा करण्यात आला आहे. या कायद्यान्वये कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ होत असल्यास त्या पोलीस ठाण्यात तक्रार करू शकतात किंवा आपल्या वरिष्ठांना त्याबाबत तक्रार करू शकतात. पण जर त्यावेळी तक्रार करायला घाबरलात तर समोरच्या व्यक्तीला पळवाटा मिळू शकतात. असे प्रसंग ओढवल्यास वेळ न घालवता तेव्हाच्या तेव्हा तक्रार करायला हवी. त्याचवेळी जर अन्यायाला वाचा फोडली तर असे प्रसंग पुन्हा घडणार नाहीत किंबहुना ते कमी होतील.
विशाखा समिती
महिलांवर जे अत्याचार होत आहेत त्यासाठी विशाखा समिती नेमलेली आहे. विशाखा मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे कामाच्या ठिकाणी स्त्रियांच्या होणाऱ्या लैंगिक छळाच्या अनुषंगाने सर्केच्च न्यायालयाने घालून दिलेली काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यात ही समिती नेमलेली आहे. समितीमार्फत आपण शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन कायद्याविषयी माहिती देतो किंवा पोलीस ठाण्यात येणारे अनुभव त्यांना मार्गदर्शन करत असतो. यामध्ये कोणताही अस्वागतार्ह शारीरिक स्पर्श, शरीरसंबंधांची मागणी किंवा विनंती, लैंगिकता सूचक शेरे मारणे वा अश्लील बोलणे, कामूक वा अश्लील चित्रे दाखवणे किंवा एसएमएस, ईमेल करणे, लैंगिकता सूचक कृती, शारिरीक, मौखिक किंवा निःशब्दपणे केलेली अन्य कोणतीही कृती वाटल्यास विशाखा समितीची मदत घेता येते.
या गोष्टी लक्षात घ्या
- कुणाकडून चुकीचं होतंय असं वाटल्यास त्याचक्षणी त्याला रोखा. ठाम उभे राहाल तर सगळे तुमच्या पाठीशी उभे राहतील. फक्त त्याचवेळी आवाज उठवा.
- काही महिलांना कामानिमित्त रात्री-अपरात्री बाहेर राहावे लागते. अशा महिलांनी आपल्यासोबत पेपर स्प्रे ठेवावा. कुठल्याही वाहनात बसण्यापूर्वी त्या गाडीचा नंबर घरच्यांना पाठवून ठेवावा.
- ऑफिसमध्ये त्रास होत असेल तर जवळच्या सहकाऱ्याला त्याविषयी कल्पना देऊन ठेवा. सहकारी तुमची काही मदत करू शकतात किंवा काही अनुचित घडल्यास त्यांना त्याबाबत काहीच माहीत नाही असे होऊ नये.
- स्त्रिला जन्मजातच स्पर्शाची ओळख आहे. त्यांना चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श यातला फरक कळतो. स्त्रिमध्ये ती संवेदना आहे. एवढेच नाही तर वाईट नजरही त्या पटकन ओळखू शकतात. असे काही जाणवले तर त्याच क्षणी समोरच्या व्यक्तीला विरोध करा.
- माहीत नसलेल्या ठिकाणी एकटीने प्रवास करणे शक्यतो टाळा.
- समोरची व्यक्ती काहीतरी चुकीचं करतेय आणि तुम्ही काहीच करू शकत नाही, अशावेळी जोरात आरडाओरड करा. म्हणजे इतर लोकांचे लक्ष वेधले जाईल आणि तुम्हाला मदत मिळेल.
- उघडय़ा डोळ्याने बघा आणि सतर्क राहा. मुलींना मैदानी खेळात सहभागी करून घ्या, त्यांचा आत्मविश्वास वाढेल.
- महत्त्वाचे हेल्पलाइन नंबर जतन करून ठेवावेत. 100 नंबर सर्वांसाठी, 108 नंबर ज्येष्ठांसाठी आणि 103 नंबर महिलांसाठी आहे. काही अनुचित वाटल्यास लगेच त्या नंबरवर कॉल करावा.
दाद शेवटपर्यंत राहावी
दहा किंवा पंधरा वर्षाने आपण फिर्याद केली, दाद मागितली तर फारसा उपयोग होत नाही. कारण कायद्यात सतत बदल होत असतात. त्याचवेळी जर अन्यायाला वाचा फोडली असती तर त्यावर कायदेशीर बडगा उगारता येतो. म्हणून सतत पाठपुरावा करणे तेवढेच आवश्यक आहे. एवढय़ा वर्षांनंतर पुरावे नष्ट झालेले असतात. कायदा महिलांच्या बाजूने आहे, पण त्यासाठी योग्य पुरावे असणेही तेवढेच आवश्यक आहे. फिर्याद केली तर ती शेवटपर्यंत राहायला हवी. याचे दोन फायदे असतात. जर त्याचवेळी दाद मागितली तर पुढच्या घटना टळतात आणि व्यवस्थित न्याय मिळू शकतो. सध्या समाज माध्यमातून आपण इतके सतर्क झालो आहोत की कायद्यालाही आपली दखल घ्यावीच लागते. योग्य गोष्टीसाठी सगळेच पाठीशी उभे राहायला हवेत.
कायद्याला दखल घ्यावीच लागते
पोलिसांकडे चकरा कशाला मारायच्या हा विचार मनातून काढून टाकायला हवा. तुम्ही पुढेच आलात नाही तर तुम्हाला त्यातली प्रोसेस समजणार नाही. अन्यायाला वाचा फोडायची तर काही गोष्टींचा विचार करून चालणार नाही. महिलांसाठी अनेक सुविधा आहेत, कायदे आहेत. ती प्रकरणे फास्ट ट्रक कोर्टात चालतात.
दीपाली कुलकर्णी, सहाय्यक पोलीस निरीक्षक, मुलुंड































































