टाळ-मृदंगाच्या गजराने रामजन्मभूमी दुमदुमणार, हजारो वारकरी अयोध्येत धडकणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
भगव्या झेंड्यासह वारकरी

सामना प्रतिनिधी । मुंबई

विजयादशमीनंतर प्रभू रामचंद्रांचा जयघोष आणि टाळ-मृदंगाच्या गजराने रामजन्मभूमी दुमदुमणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील हजारो वारकरी राममंदिर उभारणीसाठी अयोध्येत धडकणार आहेत. वारकरी प्रबोधन महासमितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत तसा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. अयोध्येत जाण्याची तयारीही वारकऱयांनी सुरू केली असून आता मंदिर निर्मिती हेच प्रमुख लक्ष्य समस्त वारकऱयांनी ठेवले आहे.

अयोध्येच्या सीमेवरून दिंडय़ा निघणार
महाराष्ट्र आणि देशाच्या कानाकोपऱयातील वारकरी रेल्वे आणि अन्य वाहनांनी अयोध्येच्या सीमेपर्यंत जाणार आहेत. त्यानंतर सीमेवरून रामजन्मभूमीपर्यंत रामनामाचा जयघोष करत टाळ-मृदंगाच्या गजरात शेकडो दिंडय़ा निघतील. अखंड रामनामाचा जप करतच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली वारकरी मंदिर निर्मितीच्या पावनकार्यात सहभागी होतील.

अखिल भारतीय संत समितीचे महामंत्री आणि वारकरी प्रबोधन महासमितीचे संस्थापक अध्यक्ष ह. भ. प. रामेश्वरशास्त्राr महाराज यांनी ही माहिती दिली. रामाच्या नावावर सत्ता बळकावलेल्या भाजपने अयोध्येत मंदिर उभारण्याचे वचन देऊनही ते पाळले नसल्याने देशातील संत समाजाबरोबरच वारकऱयांमध्येही तीव्र नाराजी असल्याचे रामेश्वरशास्त्राr यांनी सांगितले.
भाजपची अवस्था मदांध नहुषासारखी होईल

इंद्रपद प्राप्तीनंतर मदांध, कामांध झालेल्या नहुषराजाने देवी इंद्राणीला प्राप्त करण्यासाठी जाताना परमपूज्य सप्तर्षींना आपल्या पालखीचे भोई बनवले होते. त्याप्रमाणेच भाजप सरकारने सत्ताप्राप्तीसाठी समस्त संतगणांना भोई बनवून फसवणूक केली असा आरोप करत मंदिर निर्मितीत टाळाटाळ करणाऱया सरकारचाही नहुषाप्रमाणेच सर्वनाश होईल, अशी भावना वारकऱयांमध्ये असल्याचे रामेश्वरशास्त्राr यांनी सांगितले.

देशातील साधुसंतांचा शिवसेनेवर पूर्ण विश्वास

भाजपची इच्छा असती तर राममंदिर निर्मितीसाठी त्यांनी अध्यादेश काढला असता; पण त्यांनी तसे न करून देशातील कोटय़वधी हिंदूंच्या भावना पायदळी तुडवल्या आहेत, असा संताप वारकरी व्यक्त करीत आहेत. आता सरकार राममंदिर उभारत नसेल तर देशातील साधुसंत ते काम करतील आणि त्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मंदिर निर्मितीसाठी हजारो वारकरी रवाना होतील, असे रामेश्वरशास्त्राr यांनी सांगितले. आता शिवसेनाच राममंदिर उभारू शकते. आणि देशातील साधुसंतांचा शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर पूर्ण विश्वास आहे, असे त्यांनी सांगितले.