देशात पहिल्यांदाच गोशाळेत झाली गायींवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। जोधपूर

राजस्थानमधील मंडोर येथे एका गोशाळेत ऑपरेशन थिएटर उभारून तिथे पाच गायींवर मोतीबिंदूंची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यातील तीन गायींना दिसू लागले असून येत्या काही दिवसात शंभर गायींवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. गोशाळेमध्ये गायींवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आल्याची ही देशातली पहिलीच घटना आहे.

या गोशाळेत गायींवर शस्त्रक्रिया करण्यासाठी विशेष ऑपरेशन थिएटर उभारण्यात आले. त्यानंतर पशुवैद्य आणि पशुविज्ञान विश्वविद्यालयातील नेत्र विभाग प्रमुख डॉक्टर सुरेश कुमार झीरवाल व त्यांच्या टीमने पाच गायींवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया केली. याआधीही या टीमने कुत्रे, ससे, बदक आणि काही पक्ष्यांवरही मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या आहेत. पण गोशाळेत पहील्यांदाच गायींवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. तसेच जोधपूरजवळील ८ एकर जमिनीवर पसरलेल्या १४५ वर्ष जुन्या गोशाळेतही अशा प्रकारचे ऑपरेशन थिएटर उभारणार असल्याचे झीरवाल यांनी सांगितले आहे. या गोशाळेत चार हजार अधू व आजारी गायींची देखभाल करण्यात येत आहे. तसेच ७०० दृष्टीहीन गायी व सहा हजार कबुतरेही तेथे आहेत.