दसरा मेळावा: महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणती दिशा मिळणार… अवघ्या देशाचे लक्ष!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
सर्व फोटो: संदीप पागडे
सामना प्रतिनिधी | मुंबई
अवघ्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेला शिवसेनेचा दसरा मेळावा गुरुवार, 18 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता शिवतीर्थावर दणक्यात होणार आहे. प्रथा आणि परंपरेनुसार मेळाव्यात शस्त्रपूजन केले जाते. मात्र सार्वत्रिक निवडणुकीची चाहूल असल्याने यंदाच्या मेळाव्यातील शस्त्रपूजनाकडे तमाम शिवसैनिकांचे लक्ष लागून राहिले आहे.  अयोध्येच्या दिशेने ताणलेला शिवसेनेचा धनुष्यबाण आणि देशातील बदललेली राजकीय, सामाजिक परिस्थिती या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आसुड कडाडणार आहे. उद्धव ठाकरे काय बोलणार, कोणता संदेश देणार, कोणती घोषणा करणार याची उत्सुकता प्रसारमाध्यमांनाच नव्हे, तर अखंड हिंदुस्थानला आहे.
शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणजे महाराष्ट्राची वैभवशाली परंपराच. या मेळाव्याची जय्यत तयारी शिवतीर्थावर सुरू आहे. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे तेलाचा भडका उडाला आहे. इंधनांचे दर शंभरीकडे चालले आहेत. परिणामी महागाई वाढली आहे. महागाईचा अक्राळविक्राळ राक्षस सर्वसामान्यांना गिळायला उठला आहे. दुष्काळाच्या आगीत शेतकरी होरपळून निघाला आहे. राज्यासह देशातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती गंभीर बनली आहे. महिलांवरील लैंगिक अत्याचाराची एकापाठोपाठ एक प्रकरणे उघड होत आहेत. अशा धगधगत्या विषयांवर उद्धव ठाकरे आपले विचार या मेळाव्यात मांडणार आहेत.
चलो अयोध्या!
राममंदिर उभारणीसाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील हिंदू विजयादशमीनंतर अयोध्येला कूच करणार आहेत. रामलल्लाला वनवासातून बाहेर काढण्याची तयारीही सुरू झाली आहे. मंदिर निर्मितीसाठी कानाकोपऱयातील हिंदू बांधव, शिवसैनिक, वारकरी, धारकरी एकवटू लागले आहेत. आता त्यांना प्रतीक्षा आहे ती उद्धव ठाकरे यांच्या आदेशाची.
गुरुवार 18 ऑक्टोबर
स्थळ : शिवतीर्थ, दादर
वेळ : सायंकाळी 6 वा.