
सामना ऑनलाईन । ठाणे
ठाण्याच्या कासारवडवली परिसरातील घोडबंदर रोड येथे वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसाला एका भरधाव कारने उडवले. महादेव तानाजी हजारे (31) असे जखमी वाहतूक पोलिसाचे नाव असून या अपघातात ते गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी दुपारी हा अपघात घडला असून अपघाताचा हा थरार तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.
रविवारी घोडबंदर रोडवरील नागला बंदर सिग्नलवर हजारे हे वाहतूक नियमन करीत होते. यावेळी एका सफेद रंगाच्या अज्ञात इंडिका कार चालकाला त्यांनी हात देऊन थांबण्याचा इशारा केला. मात्र मुजोर कार चालक पोलिसाला न जुमानता सिग्नल तोडून भरधाव वेगाने पळाला. यावेळी वाहतूक पोलिसाने कार अडवण्याचा प्रयत्न केला असता बेरदरकारपणे पोलिसाला उडवले. तसेच जखमी पोलिसाला त्याच अवस्थेत सोडून तिथून पळ काढला. दरम्यान, या प्रकरणी कासरवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस या कार चालकचा शोध घेत आहेत.
































































